टाळेबंदीमुळे प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याने रेल्वेला प्रवास भाडय़ातून मिळणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या महसुलापासून मुकावे लागले. प्रवास रद्द झाल्याने प्रवाशांनी महिनाभरात दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेकडून तब्बल १९ कोटी ३३ लाख ७४ हजार ८८८ रुपये परत घेतले. मात्र, तरीही रेल्वेने प्रवाशांच्या रकमेवर चार महिन्यांचे व्याज कमावले.

रेल्वे तिकीट प्रवासाच्या तारखेपासून चार महिन्यांपूर्वी आरक्षित करण्यात येते. मार्चअखेरीस टाळेबंदी लागू झाल्याने नोव्हेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत तिकीट खरेदी करणाऱ्यांचा प्रवास रद्द झाला. रेल्वेगाडी रद्द झाल्याने प्रवाशांना संपूर्ण रक्कम परत करावी लागते. टाळेबंदीमुळे रद्द झालेल्या गाडय़ांच्या आरक्षित तिकिटाची रक्कम रेल्वेने २२ मे पासून प्रवाशांना परत करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून २१ मे पर्यंत  १९ कोटी ३३ लाख ७४ हजार ८८८ रुपये परत केले. मात्र, चार महिने रेल्वेने प्रवाशांची रक्कम वापरली. नागपूर विभागाने महिनाभरात ३ कोटी ८५ लाख रुपये प्रवाशांना परत केले. प्रवाशांना रक्कम परत करण्यासाठी प्रवासाच्या तारखेपासून सहा महिन्यांपर्यंत मुदत वाढवली आहे, असे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

३० दिवसांत २३ हजार तिकिटे रद्द

या महिन्यात दोन लाख ७९ हजार १७८ प्रवाशांनी रक्कम परत घेतली. यातून १८ कोटी ८ लाख ५० हजार ३२० रुपये परत केले गेले.  ऑनलाईन व ई-तिकिटांचे १७ हजार ७५० रुपये प्रवाशांना परत केले. ही एकूण जमा झालेली रक्कम १ कोटी २५ लाख २५३ रुपये एवढी होती. अशाप्रकारे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे ३० दिवसात दोन लाख ९६ हजार ९२८ प्रवाशांची रक्कम परत केली. नागपूर विभागातील विविध तिकीट खिडक्यांच्या माध्यमातून २३ हजार तिकिटाची रक्कम परत करण्यात आली.

– के.व्ही. रमना, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, द.पू.म. रेल्वे.