नागपूर : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी काँग्रेसशी आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने विदर्भातील दहा जागांपैकी आठ जागांवर काँग्रेसला मतविभाजनाचा धोका आहे.

बसपचा विदर्भात विशिष्ट मतदार वर्ग आहे. त्यामुळे बसपच्या उमेदवाराला ५० ते एक लाखाच्या घरात सहज मते प्राप्त होतात. २००९ आणि २०१४ च्या बसपच्या मतांची टक्केवारी बघितली तर लक्षात येईल की विदर्भात अनेक उमेदवारांनी लाखाच्या वर मते घेतली आहेत. भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारच्या धोरणांवर हा मतदार प्रचंड नाराज वाटत आहे. त्यामुळे बसपची मतांची टक्केवारी यावेळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढत होईल. तेथे बसप जिंकेल, असा दावा बसपचे प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी केला.

उत्तर प्रदेशात परस्परातील आदरभावामुळे समाजवादी पक्षाशी आघाडी केली. मात्र इतर राज्यात कोणाशीही आघाडी करणार नाही, असे मायावती यांनी कालच स्पष्ट केले. केंद्रीय आणि प्रदेश कार्यकारीने गेल्या शनिवारी विदर्भातील निवडणूक तयारीसाठी नागपुरात बैठकदेखील घेतली.

या पक्षाला जेवढे मतदान होते, तेवढय़ाच मताने अनेक मतदारसंघात विजयी उमेदवाराचे मताधिक्य होते.

अनेक ठिकाणी लाखांवर मते

विदर्भातील दोन-तीन मतदारसंघ सोडल्यास गेल्या दोन निवडणुकीत बसपच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत ५० हजार ते १ लाख ३५ हजारांच्या घरात मते मिळाली आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघात २०१४ ला बसपने ९० हजार ८६६ आणि २००९ मध्ये १ लाख ३१ हजार ६४३ मते घेतली. नागपूरमध्ये २०१४ ला ९६ हजार ४३५ आणि २००९ मध्ये १ लाख १८ हजार ७४१ मते प्राप्त केली. गडचिरोली-चिमूरमध्ये गेल्या निवडणुकीत ६६ हजार ८७७ आणि २००९ मध्ये १ लाख ३५ हजार ७५६ मते मिळवली. तसेच अमरावतीमध्ये गेल्या निडवणुकीत ९८ हजार २००, रामटेकमध्ये  २०१४ मध्ये ९५ हजार ५१, भंडारा-गोंदियामध्ये ५० हजार ९५८, चंद्रपूरमध्ये २०१४ ला ४९ हजार २२९ आणि २००९ ला ५७ हजार ५१९, यवतमाळ-वाशिमध्ये गेल्या निवडणुकीत ४८ हजार ९८१ आणि २००९ मध्ये ६२ हजार ७८१, बुलढाणामध्ये २०१४ ला ३३ हजार ७८३ आणि २००९ मध्ये ८१ हजार ७६३ मते मिळवली होती.