News Flash

‘हल्दीराम’च्या संचालकांचा अपहरण कट रचणारे जेरबंद

पाचही आरोपींना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींसह धंतोली पोलीस

हल्दीरामचे संचालक राजेंद्र अग्रवाल यांच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात धंतोली पोलिसांना यश आले आहे. हा कट उघडकीस आल्याने मोठी घटना टळल्याचा नि:श्वास पोलिसांनी टाकला आहे. पाचही आरोपींना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

श्याम बहादुर ऊर्फ पप्पू ऊर्फ शमशेर सिंग (४०) रा. हिरवीनगर, अतुल गोपाल पाटील (२४), सौरभ भीमराव चौहान (२१), विनोद भूमेश्वर गेडाम (२३) सर्व रा. रामबाग आणि रोहित राजेंद्र घुमडे (२९) रा. सक्करदरा अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचा सहावा साथीदार फरार आहे. श्याम बहादूर हा राजेंद्र अग्रवाल यांच्याकडे १३ वर्षांपासून वाहनचालक होता. तो मूळचा उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील रहिवासी आहे. मात्र, तो परिवारासह नागपुरातच राहायचा. तो वाहनातून डिझेल चोरी करीत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अग्रवाल यांनी त्याला कामावरून काढून टाकले. त्यानंतर श्याम बाहदूरने इतर आरोपींना हाताशी धरले.

त्यांच्यासोबत अग्रवाल यांचे अपहरण करून ५० लाख रुपये खंडणी मागण्याची योजना आखली. अग्रवाल हे आपल्या चालकाला घेऊन दर शनिवारी लोहा पूल परिसरातील शनि मंदिरात जात असल्याचे त्याला माहीत होते. २८ एप्रिल २०१८ ला सर्व आरोपी एमएच-३१, ईए-४२६० क्रमांकाच्या मारुती व्हॅनने शनि मंदिराजवळ पोहोचले. श्याम बहादूर इतर एकासह व्हॅनमध्येच बसला, तर इतर चार जण अग्रवाल यांचे अपहरण करण्यासाठी मंदिराजवळ गेले. त्यांनी चुकीने अग्रवाल समजून त्यांचा वाहनचालक कपीराज लालधर चौहान (२६) रा. वडगाव, उत्तर प्रदेश याला पकडले. मात्र, त्याने आरडाओरड केल्याने आरोपी पळून गेले.

या प्रकरणात धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश शेंडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अनंतराव वडतकर, वीरेंद्र गुळरांधे, दिनेश घुगे, सुरेश जाधव, पंकज हेडाऊ, हेमराज बेरार, देवेंद्र भोंडे, कमलकिशोर चव्हाण यांनी तपास करून आरोपींना अटक केली.

असे सापडले आरोपी

श्याम बहादूर याने २८ जूनला चोरीच्या मोबाईलने अग्रवाल यांना भ्रमणध्वनी करून ५० लाख रुपये खंडणीची मागणी केली, अन्यथा अपहरण करण्याची धमकी दिली. पोलिसांनी शोध घेतला असता तो रस्त्याच्या कडेला सामान विकणाऱ्याचा मोबाईल असल्याचे स्पष्ट झाले. मोबाईलवरून करण्यात आलेल्या कॉलमुळे हे सर्व आरोपी अडकले.

सारखे कपडे घातल्याने बचावले

२८ एप्रिलला शनि मंदिरात जाताना अग्रवाल व चालकाने सारखेच कपडे घातले होते. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर अग्रवाल यांनी वाहनचालकाच्या हातात मिठाई  दिली. तो मिठाई वाटत असताना आरोपींना तोच अग्रवाल असल्याचे वाटले व त्यांनी त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केला. सारखे कपडे घातल्याने अग्रवाल बचावले.

 

 

सत्यवान. सावित्री आणि चला हवा येऊ द्या!

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांवर केलेली टीका टिप्पणी चांगलीच गाजली. सरकारला एकीकडे विरोध करायचा व दुसरीकडे त्यांच्या बचावासाठी धावून जायचे या शिवसेनेच्या भूमिकेवर टीका करताना विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्यवान आणि शिवसेनेला सावित्री असे संबोधले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेला ‘चला हवा येऊ द्या’ असे उत्तर दिले. गेल्या साडेतीन वर्षांत सातत्याने वेगवेगळ्या मुद्यांवरून शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. नाणार प्रकल्पावरून भाजप-शिवसेना समोरासमोर आले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रकल्प रद्द करण्याची अधिसूचना काढण्याचे सांगितले होते, तर त्याचवेळी केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी एका कंपनीशी करार केले होते. विरोधी पक्षाने यावर व्यंगचित्रातून प्रहार केले.

एका व्यंगचित्रातून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे  हे ‘२१२ व्यांदा सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा द्यावा लागणार, असे म्हणत असल्याचे दर्शवण्यात आले, तर आणखी एका चित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानाशी जाऊन उद्धव ठाकरे बोलत असल्याचे रेखाटण्यात आले आहे आणि ऐकलं का.. मी सत्तेतून बाहेर पडायचं म्हणतोय.. असे ओळ टाकण्यात आली आहे. अशाप्रकारे विरोधी पक्षाने व्यंगचित्रात माध्यमातून सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजपने नाणार प्रकल्प लावून धरल्याने शिवसेनेची अब्रू गेली आहे. शिवसेनेच्या सतत मवाळ भूमिका का घेते, याचे रहस्य नुकत्याच झालेल्या वटपौर्णिमेला कळाले. हे सरकार म्हणजे न पटणाऱ्या पती-पत्नीचा संसार आहे. पती कसाही असो, मात्र तो संसार टिकावा म्हणून महिला वडाची पूजा करतात. तिच भूमिका शिवसेना पार पाडते आहे.

खरे तर भाजपच्या या सरकारचा प्राण केव्हाच गेला असता, पण शिवसेनेच्या रूपातली आधुनिक सावित्री भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याने हे सरकार अजून जिवंत आहे. शिवसेना ज्याप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधते, तसेच त्यांनी आता आपल्या गळ्यात भाजपच्या नावाचे मंगळसूत्रही घालून घ्यावे आणि सुखाने संसार करावा, अशी टीका केला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता, ‘चला हवा येऊ द्या’ या चित्रपटातील हा संवादफेक होता का, असे सांगून यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 1:46 am

Web Title: loksatta crime news 98
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या प्रश्नासह भूखंड घोटाळा गाजणार
2 सरकारच्या घोषणा म्हणजे अफवाच
3 विरोधकांच्या अफवांना वस्तुस्थितीने उत्तर देणार
Just Now!
X