हिमालयाकडून येणाऱ्या थंड व कोरडय़ा वाऱ्यामुळे अवघा महाराष्ट्र गारठला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा गारठा अधिकच वाढला असून, या हिवाळ्यातील सर्वाधिक कमी तापमान गोंदिया येथे ६.५ इतके नोंदविण्यात आले. तर त्यापाठोपाठ नागपूर येथे या हिवाळ्यातील सर्वाधिक कमी तापमान ७.१ इतके नोंदवण्यात आले. ही स्थिती आणखी एक दिवस कायम राहण्याची शक्यता असून २३-२४ जानेवारीनंतर मात्र तापमानात पुन्हा वाढ होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस तापमान ५ अंश सेल्सिअस इतके कमी नोंदवण्यात आले होते. ४७ वर्षांतला नागपूर शहराचा तापमानातील तो निच्चांक होता, कारण ४७ वर्षांपूर्वी डिसेंबरच्या अखेरीस ५.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नागपूर शहरात नोंदवण्यात आले होते. यावर्षी तापमानाचा निच्चांक इतका घसरला नसता पण, हिमालयाकडून येणाऱ्या थंड आणि बोचऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा परिणाम अधिक जाणवतो आहे. जागतिक पातळीवर गेल्या काही वर्षांत तापमानात मोठय़ा प्रमाणात चढउतार झाले आहेत. ऑक्टोबरच्या मध्यात सुरू होणारी थंडी गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या मध्यात सुरू झाली. तर डिसेंबरच्या अखेरीस थंडीची थोडी कुणकुण लागली आणि जानेवारीत थंडी पूर्णपणे जाणवू लागली.

गेल्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत थंडीचा परिणाम जाणवत होता. यावेळी मात्र तशी काहीच शक्यता नाही. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढतो. राजस्थान, पंजाब, हरयाणा या राज्यात तापमानाचा निच्चांक अधिक असतो तर विदर्भात ते सहा, सातपर्यंत जाते. ही पातळी विदर्भाने आता गाठली आहे. हिवाळ्यात तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत असायला हवे, पण हवामान बदलामुळे या तापमानातील बदलात सातत्य नाही. आज नोंदवण्यात आलेले तापमान हे हिवाळ्यातील सर्वाधिक कमी तापमान आहे.