येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) करोनाची चाचणी वाढवण्यासाठी दोन अद्ययावत यंत्रे काही दिवसांपूर्वी पोहचली. परंतु ती कार्यान्वित करण्याची जबाबदारी असलेल्या अहमदाबादच्या तंत्रज्ञाला येथे आल्यावर विलगीकरणाच्या नियमाची भीती आहे. त्यामुळे यंत्र कार्यान्वित करण्यात पेच निर्माण झाला आहे. एम्स प्रशासन स्थानिक प्रशासनासोबत समन्वय करून तातडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.

उपराजधानीत सध्या मेयो, एम्स, मेडिकल, निरी, माफसूच्या तब्बल पाच विषाणूजन्य प्रयोगशाळांमध्ये करोना चाचण्या सुरू आहेत. विदर्भात रुग्ण वाढत असल्याने तेथील नमुनेही नागपूरला तपासायला येत असल्याने येथील प्रयोगशाळांवर कामाचा भार वाढत आहे. मालेगावला रुग्ण वाढल्याने व तेथील करोना चाचणीला मर्यादा असल्याने तेथील तीनशेहून अधिक नमुने नागपूरच्या प्रयोगशाळेत तपासून दिले गेले.

नवीन संचाचीही समस्या

करोना चाचणीसाठी संबंधित व्यक्तीच्या घसा, नाकातील द्रव्याचे नमुने आर-टी पीसीआर यंत्रावर लावल्यावर विशिष्ट कालावधीनंतर या नमुन्यांवर काही रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यानंतर सूक्ष्म निरीक्षण करून करोनाचे निदान होते. परंतु सध्या नागपुरात मानवीय पद्धतीने ही दुसऱ्या टप्प्यातील रासायनिक प्रक्रिया होते. दुसरीकडे या यंत्रावर करोना चाचणीसाठी नवीन पद्धतीच्या किट्सची गरज आहे. ती उपलब्ध व्हायला काही वेळ लागण्याची शक्यता आहे.

अडचण काय?

नागपुरात तपासणी वाढवण्यासाठी आणखी एक आरटी- पीसीआर आणि ऑटोमॅटिक आरएनए अ‍ॅस्ट्रॅक्टर (स्वयंचलित प्रक्रिया करणारे यंत्र) यंत्र एम्सला काही दिवसांपूर्वी पोहोचले आहे. यंत्र कार्यान्वित करण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीचे तंत्रज्ञ सध्या अहमदाबादला आहेत. तेथून त्यांना नागपूरला यायचे असून सध्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद असल्याचा त्यांनाही फटका बसत आहे. दुसरीकडे अहमदाबाद आणि नागपुरातही करोनाचे रुग्ण जास्त आहेत. एका राज्यातून कुणी व्यक्ती दुसऱ्या राज्यात गेल्यास त्याला काही दिवस विलगीकरणात राहावे लागते.

..तर एम्समध्ये २५० ते ३०० चाचण्या

एम्समध्ये सध्या एका आरटी-पीसीआर यंत्रावर करोना चाचणी सुरू आहे. दुसरेही आरटी-पीसीआर यंत्र येथे पोहचले असून नवीन ऑटोमॅटिक आरएनए अ‍ॅस्ट्रॅक्टर हे यंत्रही आले आहे. या स्वयंचलित अ‍ॅस्ट्रॅक्टर यंत्रावर जुन्या पद्धतीच्या तुलनेत दीड तास कमी कालावधीत चाचणी पूर्ण होते. त्यामुळे येथील करोना चाचण्यांची संख्या सर्व यंत्रे कार्यान्वित झाल्यावर २५० ते ३०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

एम्सकडून करोना चाचणी वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून दोन अद्ययावत यंत्रे येथे पोहचली आहेत. किट्स येताच दुसऱ्या आरटी-पीसीआर यंत्रावरही करोना चाचणी सुरू होईल. नवीन यंत्र कार्यान्वित करण्याची काहीही समस्या नसून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होण्याची आशा आहे.

– मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, संचालक, एम्स, नागपूर</p>