नागपूर : टिपेश्वर अभयारण्यातील वाघ लांब अंतराच्या स्थलांतरणाचा इतिहास रचत असताना या संचारमार्गाच्या संरक्षण व संवर्धनाचे मोठे आव्हान वनखात्यासमोर आहे. विदर्भ ते मराठवाडा हा जुना संचारमार्ग आहे आणि गेल्या दीड वर्षांत दोन वाघांनी याच संचारमार्गातून दोन हजार आणि तीन हजार किलोमीटरचा प्रवास के ला आहे. यातील एका वाघाने परतीचा मार्ग स्वीकारला, तर एक मराठवाडय़ातच स्थिरावला आहे.

जून २०१९ मध्ये यवतमाळ जिल्ह्य़ातील टिपेश्वर अभयारण्यातून ‘टी१सी१’ या वाघाने के लेले तीन हजार किलोमीटरचे स्थलांतरण आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाचा विषय ठरले होते. दीड वर्षांनंतर त्याच मार्गावरून ‘टी३सी१’ या वाघाने स्थलांतर के ले. ‘टी१सी१’ हा वाघ विदर्भ-मराठवाडा-विदर्भ असा प्रवास करत बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला. मात्र, ‘टी३सी१’ हा मार्च महिन्यात स्थलांतरित झालेला वाघ अजूनही मराठवाडय़ातच तळ ठोकू न आहे. औरंगाबाद शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावरील गौताळा अभयारण्यात वनरक्षकांना वाघांच्या पाऊलखुणा आणि वाघाने के लेल्या शिकारीचे पुरावे मिळाले. १५ मार्चला कॅ मेरा ट्रॅपमध्ये वाघाचे छायाचित्र आले. त्यानंतर वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा आढळत असल्या तरी वाघाचे छायाचित्र मिळाले नव्हते. चार महिन्यानंतर सहा जुलैला पुन्हा एकदा या वाघाचे छायाचित्र कॅ मेरा ट्रॅपमध्ये आले. तर ३१ जुलैला वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या.

टिपेश्वर अभयारण्यात गेल्या काही वर्षांत वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नव्या अधिवासाच्या शोधात ते येथून बाहेर पडत आहेत. पैनगंगा, ज्ञानगंगा, काटेपूर्णा असा प्रवास करत हे वाघ मराठवाडय़ाकडे जात आहेत. वाघांचा हा जुना संचारमार्ग असल्याने भविष्यात पुन्हा या संचारमार्गातून वाघांचे स्थलांतरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सातपुडा, अजिंठा पर्वतरांगांमधील गौताळा अभयारण्यात काही वर्षांपूर्वी वाघांचे अस्तित्व होते. आता अनेक वर्षांनंतर वाघ याठिकाणी स्थिरावल्याने त्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान वनखात्यासमोर आहे.

गौताळा अभयारण्य पोषक पण..

गौताळा अभयारण्यात व्याघ्र अधिवासासाठी चांगले व्यवस्थापन झाले तर वाघांसाठी तो उत्कृष्ट अधिवास ठरू शकतो. मात्र, सध्याच्या स्थितीत या अभयारण्य परिसरातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. तसेच या अभयारण्य परिसरात गारगोटीच्या (पांढरा दगड) आणि चंदनाच्या तस्करीचे मोठे आव्हान आहे. अतिक्र मणाचा प्रश्नही गंभीर आहे.