खामला परिसरात महिनाभरात तीन घटना
मंगेश राऊत, नागपूर</strong>
गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळीयुद्ध व अवैध धद्यांच्या वादातून अनेक खून झाले आहेत. अशा परिस्थितीत सट्टय़ाच्या पैशाच्या वादातून अवैध धंदे चालवणारे आता रस्त्यावर येऊन मारहाण करायला लागले आहेत. गेल्या महिनाभरात राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला परिसरातील अशा तीन घटना घडल्या असून पोलिसांना खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
मार्च महिन्यात गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूच्या वादातून कुख्यात गुंड अविनाश ढेंगे याचा खून करण्यात आला. त्याच महिन्यात जुगाराच्या वादातून अजनी पोलीस ठाण्यांतर्गत फुलमती लेआऊटमध्ये बुद्धराम कैथवास याचा खून करण्यात आला, तर कळमना पोलीस ठाण्यांतर्गत दारूच्या वादातून शेख इरफान अब्दुल रज्जाक अंसारी (१९) रा. वनदेवीनगर याचा खून करण्यात आला. इमामवाडा परिसरातही बादल गजभिये या कुख्यात गुंडाचा खून झाला. त्यानंतर तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार चौकात ५ मे च्या रात्री कुख्यात अंकित धकाते याचा खून करण्यात आला. अवैध धंदे, दारूचा वाद आणि इतर कारणांमुळे या खुनाच्या घटना घडल्या.
तीन दिवसांपूर्वी एक पत्रकार खामला रस्त्याने ऑरेंज सिटी रुग्णालयात येत असताना रस्त्यावर दोन गटात हाणामारी सुरू होती. त्यावेळी रस्त्यावरील एक दुचाकी पत्रकाराच्या दुचाकीवर आदळली. संबंधित पत्रकाराने विचारणा केली असता सट्टय़ाच्या पैशातून वाद झाल्याचे समजले. पत्रकाराने एकाला पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. पण, त्याने पोलिसांत न जाणे पसंत केले. खामला रस्त्यावरील अनेक दुकानदार चौकात आता नेहमीचेच असे प्रकार होत असून गेल्या काही दिवसांतील ही तिसरी घटना असल्याचे त्या पत्रकाराला सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपासून खामला परिसरात सट्टापट्टी चालवणारे कुख्यात लोकांकडून पैशाची वसुली करीत आहेत. पैसे न देणाऱ्यास रस्त्यावर पकडून मारहाण करीत आहेत. पण, कुणीच पोलिसांपर्यंत जात नाही. भविष्यात या प्रकरणातून मोठी हिंसक घटना घडण्याची शक्यता आहे.
चौकशी करून कारवाई
परिसरात अशाप्रकारचे अवैध धंदे नाहीत. पोलिसांच्या अपरोक्ष असे प्रकार चालत असतील, तर ती गंभीर बाब आहे. याची माहिती घेण्यात येईल. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– सुनील शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.