‘महापरीक्षा पोर्टल’चा भोंगळ कारभार; शेकडो विद्यार्थी परीक्षेला मुकले; पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी

नागपूर : सरकारी पदभरतीसाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या ‘महापरीक्षा पोर्टल’चा सावळा गोंधळ समोर आला आहे. न्यू कोराडी रोड येथील तेजस्विनी कनिष्ठ महाविद्यालय येथील केंद्रावर सोमवारी दुपारच्या सत्रात घेण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिक परीक्षेदरम्यान अनेकदा पोर्टल बंद पडल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी पुढे येत आहे.

महाराष्ट्र राज्य मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी सोमवारी राज्यातील विविध केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. नागपूर विभागातील २८८ जागांसाठी शहरातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. सोमवारी दुपारी २.३० ते ४.३० या वेळात परीक्षा होणार होती. त्यासाठी विद्यार्थ्यांना दुपारी १ ते २ दरम्यान केंद्रांवर पोहचायचे होते. तेजस्विनी महाविद्यालयांमधील केंद्रावर दुपारी २.३० वाजता परीक्षा सुरू होणार होती. मात्र, या केंद्रावर दोन खोल्यांमधील सव्‍‌र्हरची समस्या असल्याने पोर्टल सुरू झाले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

यावेळी केंद्रावर सव्‍‌र्हरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करायलाही तज्ज्ञ कर्मचारी नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे एक तासाने म्हणजे ३.३० वाजता सव्‍‌र्हरमधील बिघाड दूर झाल्यानंतर अखेर परीक्षा सुरू झाली. मात्र, या सर्व गोंधळात विद्यार्थ्यांचा एक तास गमवावा लागता. त्यानंतरही परीक्षा सुरू झाली तरी पुढच्या काही वेळातच पुन्हा पोर्टल बंद पडल्याने ४.१५ वाजताच विद्यार्थ्यांचे संगणक आपोआप बंद झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रचंड गोंधळ  घातला. याच केंद्रावर अन्य खोल्यांमध्ये सुरळीत परीक्षा सुरू होती. मात्र, दोन खोल्यांमध्येच महापरीक्षा पोर्टल आणि सव्‍‌र्हरची समस्या निर्माण झाल्याने येथील २०० विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी ही विदर्भाच्या विविध भागांतून आले होते.

परीक्षेदरम्यान झालेल्या गोंधळाची माहिती केंद्रप्रमुखांना दिली असता आमच्या हातात काही नाही, आम्ही काहीच करू शकत नाही, केवळ बरच्या अधिकाऱ्यांना ही समस्या सांगू अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. शेवटी कोराडी पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी करीत विद्यार्थ्यांची तक्रार लिहून घेतली. मात्र, ‘महापरीक्षा पोर्टल’च्या नेहमीच्या अशा तक्रारींमुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा घेण्यासह हे पोर्टलच बंद करण्याची मागणी केली.

स्टाफ सिलेक्शन परीक्षेतही गोंधळ

कर्मचारी निवड आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन परीक्षेदरम्यान हिंगणा येथील जी.एस. रायसोनी परीक्षा केंद्रावरही सोमवारी गोंधळ झाला. परीक्षेला येण्यास थोडा विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. तर आधारची मुळ प्रत आणली नसल्यानेही काही परीक्षाथ्र्रीना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला.