मुख्य आयुक्तांकडून मेट्रोच्या प्रवासी वाहतुकीला हिरवा कंदील

मेट्रोची ‘अ‍ॅक्वालाईन’ सीताबर्डी ते लोकमान्यनगर (हिंगणा) या मार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून महामेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे शनिवारी या मार्गावरून पंतप्रधानांच्या मेट्रोसफरीचा मार्ग मोकळा झाला आहे.

बर्डी ते लोकमान्यनगर या मार्गावरून प्रवास करताना अंबाझरी तलाव लागतो. त्याचे विहंगम दृश्य मेट्रोतून दिसते. त्यामुळे या मार्गाला ‘अ‍ॅक्वालाईन’ असे नाव महामेट्रोने दिले आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सांयकाळी ५ वाजता सुभाषनगर स्थानकावर होणारआहे. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतरही प्रमुख नेते व अधिकारी सुभाषनगर ते बर्डी या दरम्यान मेट्रोने प्रवास करणार आहेत.

मेट्रोचे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग व त्यांची चमू मंगळवारपासून सुरक्षाविषयक तपासणीसाठी नागपुरात आली आहे. दोन दिवस त्यांनी हिंगणा डेपो, रेल्वे रुळ, प्रवाशांच्या सुविधा, सिग्नलिंग, ब्रेक आणि इतरही  तांत्रिक बाबींची तपासणी केली. गुरुवारी त्यांनी सीआरएमएस कायद्यातील  संचालन आणि देखरेख कायदा २००२ कलम १५ मधील तरतुदीनुसार  ११ किलोमीटरच्या मार्गावरील प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली, असे असे महामेट्रोकडून सांगण्यात आले. त्यामुळे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रवासी सेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा मार्गावर खापरी ते बर्डी या दरम्यान ही सेवा आधीपासूनच सुरू आहे. दरम्यान, महामेट्रोने पंतप्रधानांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. सुभाषनगर आणि बर्डी जंक्शन ही दोन्ही स्थानके एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखी सजली आहेत. सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज झाली आहेत.दर तासाला धावणारबर्डी ते लोकमान्य नगर (हिंगणा) या मार्गावर दर तासाने मेट्रो धावणार आहे. सकाळी ८ वाजतापासून ही सेवा सुरू होईल. शेवटची फेरी लोकमान्यनगर येथून सायंकाळी ८ वाजून १० मिनिटांनी आणि बर्डी येथून सायंकाळी ९ वाजता निघेल. या मार्गावर इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनियर, सुभाषनगर आणि लोकमान्यनगर अशी तीन स्थानके आहेत. बर्डी ते लोकमान्यनगरसाठी २० रु. तर सुभाषनगपर्यंत १० रु. तिकीट दर आकारण्यात येणार आहे.