28 October 2020

News Flash

आजपासून निम्म्या दरात मेट्रो धावणार

प्रथम हिंगणा मार्गावर, रविवारपासून वर्धा मार्गावर सेवा

* मुखपट्टय़ा बंधनकारक, सामाजिक अंतरावरही लक्ष *  प्रथम हिंगणा मार्गावर, रविवारपासून वर्धा मार्गावर सेवा

नागपूर : करोना संसर्गामुळे स्थगित करण्यात आलेली नागपूर मेट्रोची सेवा  सहा महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर शुक्रवारी सकाळी आठ वाजतापासून पुन्हा सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी बर्डी ते हिंगणा (लोकमान्यनगर) या मार्गावर तर रविवारपासून बर्डी ते खापरी दरम्यान वर्धा मार्गावर प्रवासी सेवा सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, मेट्रोने सर्वच टप्प्यातील तिकीट दर निम्मे केले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी या सेवेचा लाभ घेतील, अशी अपेक्षा महामेट्रोने व्यक्त केली आहे.

मेट्रो प्रवासादरम्यान प्रवाशांना मुखपट्टय़ा बांधणे बंधनकारक आहे. स्थानकांवर आणि प्रवासादरम्यानही प्रवाशांना सामाजिक अंतर पाळावे लागेल. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक डब्ब्यात सुरक्षा रक्षक ठेवण्याचे नियोजन महामेट्रोने केले आहे. मेट्रोचे सर्व कर्मचारी हातमोजे आणि इतर आवश्यक ती काळजी घेऊनच प्रवाशांना सेवा देणार आहेत.  प्रत्येक फेरीनंतर डब्यामधील आसन, लोखंडी बार आणि हॅन्डल्स सॅनिटायझरद्वारे पुसले जातील. प्रवाशांची तापमान तपासणी केली जाईल. शिवाय त्यांनाही सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची विनंती केली जाईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात मेट्रोसेवा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी राज्य शासनाने गुरुवारपासून मेट्रो सुरू करा,असे आदेश दिले. मात्र महामेट्रोकडे केंद्राने ठरवून दिलेली मानक कार्यपद्धती (एसओपी)आली नव्हती. गुरुवारी ती प्राप्त झाल्यावर मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रथम हिंगणा मार्गावर म्हणजे बर्डी ते लोकमान्यनगर दरम्यान सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत मेट्रो धावेल. रविवारपासून वर्धा मार्गावरील बर्डी ते खापरी या दरम्यान प्रवासी सेवा सुरू होईल. मेट्रोची एकूण सोळा स्थानके सज्ज आहेत. त्यापैकी चार स्थानकांना अलीकडेच सुरक्षा आयुक्तांनी हिरवी झेंडी दिली आहे. या सर्व स्थानकांवर आवश्यक ती काळजी घेऊन प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करता येणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

फक्त पाच रुपयात मेट्रो प्रवास

स्थगितीनंतर सहा महिन्याने पुन्हा सेवा सुरू करताना महामेट्रोने तिकीट दरात निम्मी कपात केली आहे. त्यामुळे मेट्रोचा प्रवास स्वस्त झाला आहे. पूर्वी ० ते ६ कि.मी. अंतरासाठी दहा रुपये दर आकारले  जात होते. आता पाच रुपये दर करण्यात आला आहे. १० ते १२ किलोमीटरसाठी २० रुपयांऐवजी १० रुपये तर १२ पेक्षा अधिक किलोमीटरसाठी ३० रुपये दर होता आता त्याऐवजी प्रवाशांना फक्त १५ रुपये मोजावे लागणार आहेत. कुठल्याही सार्वजनिक वाहतूक सेवेपेक्षा हे दर कमी आहेत, हे  येथे उल्लेखनीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:49 am

Web Title: metro will run at half fares from today zws 70
Next Stories
1 विद्यापीठ परीक्षेचा पोरखेळ सुरूच
2 काळे कृषी कायदे महाराष्ट्रात रोखणार
3 ४९ टक्के गावातच पिण्याचे पाणी
Just Now!
X