प्रकल्पाचे काम २८ टक्के पूर्ण

दोन वर्षांत प्रकल्प उभारणीतील कामाच्या गतीमुळे संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी नागपूर मेट्रो रेल्वे नवीन वर्षांत प्रकल्पाच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे कूच करणार आहे. २०१५च्या तुलनेत २०१६ मध्ये बांधकामाच्या क्षेत्रात प्रकल्पाने १८ टक्क्याने प्रगती केली असून आतापर्यंत प्रकल्पाचे एकूण २८ टक्के काम पूर्ण झाले आहे.

वर्धा मार्गावरील खापरी ते सीताबर्डी या मार्गावर मेट्रोच्या मार्ग उभारणीचे काम वेगाने सुरूआहे. नवीन वर्षांत स्थानके उभारणीपासून सीताबर्डीतील कामापर्यंतचा महत्त्वाचा टप्पा सुरू होणार आहे. तीन वर्षांत नागपुरातून मेट्रो धावायला सुरुवात होईल, असा संकल्प राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून करण्यात आला आहे. त्या दिशेने स्थानिक प्रशासनाकडून पावलेही उचलली जात आहे. मात्र, आतापर्यंत असलेली कामातील गती पुढेही कायम राहण्याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे.

मेट्रो रेल्वे कार्पोरेशनची स्थापना १८ फेब्रुवारी २०१५ मध्ये झाली होती. ८६८० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून तो एकूण ३८.२१ किलो मीटरचा आहे. उत्तर-दक्षिण (१९.६५ कि.मी.,) आणि पूर्व-पश्चिम (१८.५५ कि.मी.,) अशा दोन टप्प्यात त्याची विभागणी करण्यात आली आहे. या मार्गामध्ये एकूण ३६ स्थानके राहणार आहेत. प्रकल्पासाठी आतापर्यंत ८२.७ टक्के जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. त्यावर बांधकाम सुरू आहे. २०१५ मध्ये प्रकल्पाचे काम १० टक्क्यावर होते, २०१६ च्या अखेपर्यंत या कामाची प्रगती २८ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. २०१६ मध्ये प्रकल्पाने महत्त्वाचे टप्पे पार केले. वर्धा मार्गावरील मेट्रोच्या मार्गावर पहिला सिमेंट खांब एप्रिल २०१५ मध्ये उभारण्यात आला होता. २०१६ च्या डिसेंबपर्यंत दोन गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. खापरी ते विमानतळ या दरम्यान पहिल्या मेट्रो स्थानकाचे काम ऑगस्ट २०१६ मध्ये सुरू करण्यात आले. हिंगणा मार्गावरील स्थानकांचे काम सप्टेंबर २०१६ मध्ये हाती घेण्यात आले. मिहान डेपोच्या कामालाही डिसेंबर महिन्यातच सुरुवात झाली. निर्धारित वेळेत काम करण्यावर सरत्या वर्षांत मेट्रोने भर दिला.

२०१६ मधील प्रमुख कामे

जानेवारी – सोशल अ‍ॅण्ड एन्व्हायरमेन्टल अ‍ॅग्रीमेन्ट

फेब्रुवारी – मेट्रो स्थानकासाठी एल अ‍ॅण्ड टी, सॅस्ट्रा आणि इनिया या कंपन्यांसोबत करार

मार्च – शहरातील एकात्मिक वाहतुकीसंदर्भात सल्लागाराची नियुक्ती

एप्रिल – जर्मन बँक केएफडब्ल्यूसोबत कर्जासाठी करार

मे – ५ डीबीआयएम प्रणालीसाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती

जून – झिरो माईल आणि सीताबर्डी स्थानकासाठी

आर्किटेक्टची नियुक्ती

जुलै – जागतिक दर्जाच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेसाठी करार

ऑगस्ट – अंबाझरी उद्यानाजवळ पाच हजार वृक्ष लागवड

सप्टेंबर – नवीन विमानतळ स्थानकाचे भूमिपूजन

ऑक्टोबर – मेट्रोसाठी बोगी तयार करणाऱ्या

चीनच्या कंपनीसोबत करार

नोव्हेंबर – फ्रान्सच्या एएफडी बँकेसोबत करार

डिसेंबर – मिहानमधील रोलिंग स्टॉक डेपोचे भूमिपूजन