मा. गो. वैद्य यांचे स्पष्ट प्रतिपादन
गोडसेंची पुण्यतिथी साजरी करणे म्हणजे, हिंदुत्वाच्या विचाराला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्यामुळे त्याचे समर्थन करणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले.
एका इलेक्ट्रानिक मिडियाशी बोलताना ते म्हणाले, महात्मा गांधी यांचे जीवन श्रेष्ठ आहे. विचारांचा मुकाबला विचारांशी झाला पाहिजे. गांधीजींची हत्या चुकीची असून ते घृणित कार्य आहे. त्यामुळे त्याचे समर्थन करणे शक्य नाही. ते गोडसेंची पुण्यतिथी शौर्यदिन म्हणून साजरी करीत असले तरी ते समर्थनीय नाही. ते चुकीचे असून हिंदूंना आणि हिंदू विचारधारेला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात असून त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत किंवा संघाचे कुठलेही अधिकाऱ्यांची भेट घ्यायची असेल तर तशी वेळ घेणे आवश्यक होते. संघाच्या अधिकाऱ्यांचे कार्यक्रम आधीच ठरलेले असतात. त्यामुळे वेळेवर आलेल्या अनेक नेत्यांना भेटणे शक्य नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी आधी वेळ घेतली असती तर कदाचित त्यांना संघाचे अधिकारी कुठे आहेत, याची माहिती झाली असती. संघाचे अधिकारी कोणालाही भेटू शकतात. त्यामुळे कोणाला भेटावे आणि कोणाला भेटू नये हा विषय नसतो. बिहार निवडणुकीनंतर शत्रुघ्न सिन्हा यांना राजकारणावर वा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबाबत विचार व्यक्त करायचे असेल तर त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, असेही ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2015 2:35 am