विदर्भ विकास मंडळाच्या नेतृत्वाची धुरा

नागपूर : भाजपचे मलकापूरचे आमदार चयनसुख संचेती यांनी विदर्भ विकास मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार त्यांच्या नियुक्तीनंतर तब्बल एक वर्षांने स्वीकारला. सलग चार वेळा विधानसभेवर निवडून आलेले संचेती मंत्रिपदाचे दावेदार होते. मात्र, त्यांना संधी न दिल्याने ते नाराज होते व त्यामुळे त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता.

संचेती यांची जून २०१८ मध्ये विदर्भ विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. १९९५ ते २०१४ या दरम्यान चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले संचेती खरे तर राज्यात सत्ता आल्यावर मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, त्यांना त्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. जून २०१८ मध्ये त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणाऱ्या विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. पण त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. नुकताच राज्यमंत्रिपदाच्या विस्तारात बुलढाणा जिल्ह्य़ातून त्यांच्याऐवजी जळगाव जामोदचे संजय कुंटे यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. त्यामुळे ते मंडळाचा पदभार स्वीकारणार किंवा नाही, असे

वाटत असतानाच त्यांनी सोमवारी  पदभार स्वीकारला. मंडळाचे सदस्य डॉ. कपिल चांद्रायण आणि सहसंचालक प्रकाश डायरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे प्रशासकीय अधिकारी ईश्वर निवांत, चित्रा मेश्रे, वनिता सराफ, प्रवीण साळी आणि अनुराग नागराज उपस्थित होते.

प्रलंबित प्रश्न मार्गी लावू -संचेती

मंडळाच्या माध्यमातून विभागाचा विकास करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठपुरावा करू तसेच विदर्भातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावू,असे संचेती यांनी यावेळी सांगितले.