३५० रुपये प्रमाणे प्रतिव्यक्ती चाचणी होणार; नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना यश

नागपूर : शहरात करोना रुग्णांचे वाढते प्रमाण बघता चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी दोन फिरत्या करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू होणार आहेत. एका  प्रयोगशाळेत ३५० रुपये प्रमाणे प्रतिव्यक्ती चाचणी होणार असून एका दिवसात तीन हजार लोकांच्या चाचण्या करता येतील अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरात निर्माण झालेली परिस्थिती बघता तातडीने पावले उचलत रेमडेसिवीर इंजेक्शनसह ऑक्सिजन आणि इतर  सुविधा उपलब्ध करून दिल्या. या क्रमात आता शहरात आरटीपीसीआर चाचण्या तातडीने व्हाव्यात यासाठी  गडकरी यांनी ‘स्पाईस जेट (हेल्थ)’चे मालक अजय सिंह यांच्याशी चर्चा करून  नागपूरला दोन फिरत्या करोना चाचणी प्रयोगशाळा  देण्याची विनंती केली. ‘स्पाईस हेल्थ’ने गडकरी यांची विनंती मान्य करत ते ताबडतोब नागपूरला पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्यासाठी ‘सन फार्मा’चे दिलीप सिंघवी यांच्याशी पाच दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर आतापर्यंत शहरात ४ हजार ९०० व विदर्भात ५०० इंजेक्शन्स पोहोचले आहेत. ‘मायलॉन लेबॉरटरीज’चे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश बोमजाई यांच्याशीदेखील गडकरी यांनी संपर्क केला. त्यानंतर मायलॉनकडून शहरासाठी ६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची पूर्तता करण्यात आली आहे. अवघ्या पाच दिवसात असे एकूण ११४०० रेमडेसिवीर इंजेक्शन्स नागपूरला मिळाले आहेत.