* संचालकांच्या तक्रारीवर अद्यापही चौकशी नाही * दक्षता विभागाची संशयास्पद भूमिका

(भाग १)

मंगेश राऊत, लोकसत्ता

नागपूर : देशातील अग्रगण्य मँगनीज उत्पादन कंपनी असलेल्या ‘मॉयल’मध्ये सध्या चोरीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. भंडारा जिल्ह्य़ातील डोंगरी बुजुर्ग खाणीतून उत्खनन केलेले ८ कोटी रुपयांचे मँगनीज चोरीला गेले असून या चोरीमध्ये तेथील व्यवस्थापनाचा सहभाग असल्याची तक्रार केंद्राच्या लोह उत्पादन सचिव व केंद्रीय दक्षता आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

मॉयल ही केंद्र सरकारची मिनीरत्न कंपनी असून कंपनीचे मुख्यालय उपराजधानीत आहे. मॉयल अंतर्गत नागपूर व आजूबाजूच्या परिसरात ११ मँगनीजच्या खाणी आहेत. यात सात नागपूर, चार भंडारा आणि चार मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्य़ात आहेत. या खाणींमधून वर्षांला जवळपास १५ लाख टन मँगनीजचे उत्पादन होते.

या कंपनीत आता गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी समोर येत असून भंडारा जिल्ह्य़ातील डोंगरी बुजुर्ग खाणीतून गेल्यावर्षी ८ कोटी रुपयांचे मँगनीज लंपास करण्यात आले. स्थानिक व्यवस्थापनाच्या मदतीने या मँगनीजची चोरी करण्यात आल्याची तक्रार मॉयलच्या एका संचालकांनी मुख्यालयातील मुख्य दक्षता अधिकाऱ्यांकडे फेब्रुवारी २०१७ मध्ये तक्रार केली. त्यावेळी खाण व्यवस्थापक म्हणून आर.यू. सिंग कार्यरत होते. पण, मुख्य दक्षता अधिकारी पदावर असलेल्या प्रभारींनी जाणीवपूर्वक या तक्रारीकडे दुर्लक्ष केले व चोरीच्या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असून यामुळे सरकारचे कोटय़वधींचे  नुकसान होत असताना केवळ व्यक्तिगत लाभासाठी एकमेकांना वाचवण्याचा प्रकार मॉयलमध्ये सुरू असल्याचेही  या तक्रारीत म्हटले आहे. मुख्यालयातील दक्षता अधिकारी चोरीच्या प्रकरणात कोणतीच चौकशी करीत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी केंद्रीय दक्षता आयुक्तालयातील सचिव आणि लोह उत्पादन विभागाच्या सचिवांना पत्र लिहून सीबीआयकडून प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली.

अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार

यासंदर्भात मॉयलचे मुख्य दक्षता अधिकारी शरदचंद्र तिवारी यांच्याशी संपर्क केला असता या तक्रारीसंदर्भात आपल्याला कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  काही दिवसांत सेवानिवृत्त होणारे संचालक (वाणिज्य) टी. के. पटनायक यांनी यासंदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला. तत्कालीन खाण व्यवस्थापक आर.यू. सिंग यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही.