News Flash

प्रियकरासाठी पतीचा खून

नितीन रमेश नायर (२७) रा. भोपाळ, मूळ, सदर बाजार, बैतुल असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

 

परपुरुषाशी असलेले अनैतिक संबंध समोर आल्यानंतर एका महिलेने पतीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो खुर्चीतून पडला व मरण पावला, असा बनाव केला. मात्र, शवविच्छेदनानंतर हा अपघाती मृत्यू नसून खून असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, महिलेचा प्रियकर हा केरळ राज्यातील रहिवासी असून पती मध्यप्रदेशातील भोपाळचा आहे. तर त्याचा खून नागपुरातील बजाजनगर पोलीस ठाण्यांतर्गत झाला. नितीन रमेश नायर (२७) रा. भोपाळ, मूळ, सदर बाजार, बैतुल असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी त्याची पत्नी स्वाती नितीन नायर (२३) रा. पल्लकड, केरळ  हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. नितीन याचा भोपाळ येथे टायर रिमोल्डिंगचा व्यवसाय आहे. स्वाती ही बालमैत्रिण असल्याने २९ ऑगस्ट २०१६ ला दोघांचा विवाह झाला. त्यानंतर तिला सासूसाऱ्यांसोबत राहायचे नसल्याने नितीन पत्नीसह भोपाळ येथे राहू लागला. दरम्यान, त्याच्या वडिलांना ‘ब्रेन हॅम्रेज’चे निदान झाले. त्यांना नागपुरातील सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. आईवडील रुग्णालयात उपचार घेत असल्याने नितीन, भाऊ हरगोविंद यांनी बजाजनगर परिसरातील प्लॉट क्रमांक १०१ येथील कृष्णराव घाटोडेकर यांच्याकडे दोन खोल्या भाडय़ाने घेतल्या. दरम्यान, आईची प्रकृती सुधारली असता त्यांना सुटी देण्यात आली. परंतु वडील यांना सिम्समधून वोक्हार्ट येथे हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यावेळी नितीन, हरगोविंद आणि स्वाती हे खोलीवर राहू लागले. दरम्यान, स्वाती हिचे केरळ येथील अनिल सुकमारन नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचे नितीनला समजले. तिच्या फेसबूकवरून सर्व संवाद बघितले आणि २९ एप्रिलला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास भांडण झाले. त्यानंतर तो जमिनीवर पडल्याचे सांगून स्वातीने त्याला वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. शवविच्छेदन अहवालात नितीनचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात नितीनचा भाऊ हरगोविंद नायर (२५) रा. सदर बाजार, बैतुल याच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वातीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. नितीनच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाला.

पतीच्या अंत्यसंस्कारानंतर फरार

शवविच्छेदन अहवाल प्राप्त होण्यापूवीच तिने नितीनचा मृतदेह बैतूल येथे नेला. तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि स्वाती ही आपल्या वडिलांसह माहेरी केरळ येथे निघून गेली. त्यामुळे अद्याप तिला अटक करण्यात आली नाही, अशी माहिती बजाजनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर नंदनवार यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 3:01 am

Web Title: murder case crime
Next Stories
1 पारदर्शक कारभारासाठी स्थायी समितीच्या बैठकीचे चित्रीकरण करा
2 ‘चाय पे चर्चा’च्या आठवणीसाठी काँग्रेसचे एक दिवसाचे दिल्लीत उपोषण
3 नागपूर व ब्रम्हपुरीत तापमानाचा उच्चांक
Just Now!
X