दोन आरोपींना मोमीनपुरा परिसरातून अटक

नागपूर : ‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाने भ्रमणध्वनी आल्यानंतर मिळणाऱ्या पैशाची समान वाटणी करण्याच्या वादातून वाठोडा परिसरात शुक्रवारी एका तरुणाचा खून करण्यात आला. या प्रकरणातील दोन आरोपींना शनिवारी गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली.

इम्तियाज अली मुख्तार अली (वय २१, रा. ठाकूर प्लॉट, मोठा ताजबाग) आणि शेख कासीम ऊर्फ गोलू शेख राशीद (वय२४, रा. गौसिया कॉलनी, बेसा पॉवर हाऊसजवळ), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यश मधुकर ठाकरे ( रा.संजय गांधीनगर झोपडपट्टी) ,असे मृताचे नाव आहे. तिघांविरुद्ध दरोडय़ाचे गुन्हे दाखल आहेत. तिघेही मित्र असून त्यांना गांजाचे व्यसन आहे.

गेल्या काही दिवसांपासून यश याच्या मोबाइलवर ‘कौन बनेंगा करोडपती’मधून फोन यायचे. त्याला कोटय़वधी रुपये बक्षिसात मिळणार असल्याचे आमिष दाखविण्यात येत होते. ही बाब त्याने इम्तियाज व कासीम या दोघांना सांगितली. आपण सोबत दरोडे टाकतो. मिळालेल्या रक्कमेची तिघांमध्ये सारखी वाटणी करतो. ‘करोडपतीतून मिळाणाऱ्या रकमेचीही सारखी वाटणी करु’,असे दोघे यशला म्हणायचे. यश हा त्यांना नकार द्यायचा. दोन दिवसांपूर्वीही याच कारणावरून यशने कासीमला शिवीगाळ केली होती. याचा राग त्याच्या मनात होता. त्याने इम्तियाजच्या मदतीने यशचा काटा काढण्याची योजना आखली. दोघे दुचाकीने यशला घेऊन सेनापतीनगरमधील मोकळ्या मैदानात गेले. तेथे गांजा ओढला. त्यानंतर दोघांनी यशच्या पोटावर चाकूने वार केले. यशाचा मृत्यू झाला. दोघेही पसार झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण चौगुले, सहाय्यक उपनिरीक्षक बट्टुलाल पांडे, हवालदार देवेंद्र चव्हाण, अजय रोडे, कृपाशंकर शुक्ला, शिपाई आशिष क्षीरसागर, शिपाई सचिन तुमसरे, दीपक झाडे व श्रीकांत मारोडे यांनी तपास करून आरोपींना मोमीनपुऱ्यातून अटक केली. गुन्हेशाखा पोलिसांनी दोघांना वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन केले. दोघांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

दारुच्या उधारीवरून एकाचा खून

देशी दारुच्या उधारीवरून झालेल्या भांडणात तिघांनी मिळून एकाचा खून केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सुबोध ऊर्फ बापू विशाल मेश्राम (वय २२, रा. पाटील लेआऊट, माजरी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. प्रणय ऊर्फ गोलू राऊत (वय २२), सागर परिमल (वय २०) आणि अभिषेक चौधरी सर्व रा. माजरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रणय हा पूर्वी कॅटरिंगचे काम करीत होता. पण, करोनामुळे देशात टाळेबंदी लागू झाल्यानंतर त्याचा रोजगार गेला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो अवैधपणे देशी दारू विकत होता. सुबोध नेहमी प्रणयकडे दारू प्यायचा. सुबोधवर दारुचे शेकडो रुपये उधार होते. तो पैसे देत नसल्याने आरोपींसोबत त्याचा वाद होता. शुक्रवारी रात्री  आरोपींनी त्याला माजरी परिसरातील एम्ब्रॉयडरी कारखान्याजवळ गाठले.  सुबोधकडे पैशाची मागणी केली. त्याने नकार दिला असता चाकूने सुबोधच्या गळयावर मानेवर वार करून त्याचा खून केला.  माहिती मिळताच यशोधरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे हे  कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.