प्रकरण पुन्हा सुनावणीस घेण्याचे सत्र न्यायालयाला आदेश

नागपूर : संपत्तीच्या वादातून स्वत:च्या आईवर चाकूने वार करून खून करणाऱ्या नराधमाला चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली. तसेच याप्रकरणी काही पुरावे तपासण्यात आले नाही व आरोपीला स्वत:ची बाजू मांडण्याची पुरेशी संधी न मिळाल्याने सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे आदेश दिले.

कौस्तुभ हेमंत कुळकर्णी (३५, रा. तुकूम, चंद्रपूर), असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मोबाईलचा दुकान चालवायचा. यातून तो कर्जबाजारी झाला. स्वत:च्या डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी तो वडिलोपार्जित संपत्ती विकण्याच्या बेतात होता. पण, त्याच्या या निर्णयाला आईचा विरोध होता. २० एप्रिल २०१६ ला वडील व त्याची पत्नी घराबाहेर गेली असताना त्याने आईसोबत वाद घातला. त्यावेळी रागातून त्याने चाकूने आईला भोसकले. ती रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळली व तिचा मृत्यू झाला. आरोपी स्वत:वर खुनाचा आड येऊ नये म्हणून घर स्वच्छ केले व घराबाहेर निघून गेला.

त्याचे वडील व पत्नी घरी परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, त्यानेच आपल्या पत्नीच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून खुनाची कबुली दिली. या प्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध चंद्रपूर येथील सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला. सर्व साक्षीपुरावे तपासून २३ मे २०१८ ला सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी धरून फाशीची शिक्षा सुनावली. त्या शिक्षेला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपीला पुरेशी संधी दिली नसल्याची बाब अधोरेखित करून फाशी रद्द केली व प्रकरणावर दुसऱ्यांदा सुनावणी घेऊन नव्याने निकाल देण्याचे आदेश दिले. आरोपीतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा आणि राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. नीरज जावडे यांनी काम पाहिले.