महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला दोन दिवस शिल्लक असताना भारतीय जनता पक्षामध्ये पदाधिकारी आणि निवड समितीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. अनेकांनी आपल्याच समर्थकाला उमेदवारी मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला असून मानापमान नाटय़ही सुरू झाले आहे. अंतिम यादी तयार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘हिरवा सिग्नल’ मिळाल्यावर उद्या, गुरुवारी दुपारनंतर उमेदवारी यादी जाहीर केली जाणार आहे.

राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर महापालिकेत तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून विविध प्रभागात निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार देण्यासाठी भाजपने साडेतीन हजार इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यातून १५१ उमेदवारांची निवड करायची आहे. निवड समितीमध्ये आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्यामुळे पूर्व, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम नागपुरातील आमदारांनी आपल्या समर्थकाला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून समितीमध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मात्र विरोध केला. दक्षिण पश्चिम, पूर्व आणि मध्य नागपुरातील काही विद्यमान नगरसेवकांच्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला जात असताना त्याला काहींचा विरोध आहे. त्यामुळेच त्यातील काही विद्यमान नगरसेवकांनी पक्ष सोडून जाण्याचा आमदारांना इशारा दिल्यामुळे यापुढे आमदारांची खरी कसोटी लागणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून गणेशपेठमधील पक्षाच्या कार्यालयात बैठक सुरू असून मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत पूर्व नागपुरातील आमदाराच्या दोन समर्थकांची नावे यादीत नसल्यामुळे त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. शिवाय मध्य नागपुरात एका संघ स्वयंसेवकाला उमेदवारी देण्यावरून आग्रह धरला जात असताना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला. खुल्या गटासाठी ती जागा असूनही ओबीसी उमेदवार दिला जात असल्यामुळे पक्षाच्या महामंत्र्यांनी त्याला विरोध केला. संघ मुख्यालय असलेल्या प्रभागात भाजपचा उमेदवार आला नाही तर देशभरात बदनामी होईल म्हणून खुल्या जागेवर असलेल्या उमेदवाराला निवड समितीकडून विरोध केला जात आहे. विद्यमान नगरसेवक छोटू भोयर इच्छुकाच्या स्पर्धेत आहे. मात्र, त्याचा पत्ता कट होण्याची स्थिती आहे. त्यामुळे ते संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संघ मुख्यालय असलेल्या महाल आणि रेशीमबाग या भागातील दोन्ही प्रभाग जिंकणे भाजपसाठी प्रतिष्ठेचे असताना या दोन्ही ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे या भागात कोणता उमेदवार देणार यावरून चर्चेला ऊत आला आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ परिसरातील प्रभागात एका जागेसाठी १४ इच्छुकांचे अर्ज आहे आणि त्यातील सहा मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे या सहापैकी कोणाला उमेदवारी दिली जाते यावरून चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे भाजपमध्ये उमेवारीवरून सर्व काही आलबेल असल्याचे बोलले जात असले तरी मोठय़ा प्रमाणात धुसफूस सुरू झाली आहे. त्यामुळे यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.

उमेदवारी यादीवरून पदाधिकारी व इच्छुकांमध्ये धुसफूस नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार दौऱ्यात व्यस्त असल्यामुळे ते नागपुरात येताच उद्या, गुरुवारी दुपारनंतर उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. आमदाराचे समर्थक हा मुद्दा नसून कोणीच नाराज नाही. जो सक्षम आणि पक्षाशी एकनिष्ठ असेल अशांचा विचार करण्यात आला असून त्यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील.

सुधाकर कोहळे, शहर अध्यक्ष, भाजप