भाजपच्या सर्वेक्षणात ३८ पैकी ३१ प्रभागांमध्ये स्थानिक उमेदवारांचीच मागणी

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये आरक्षित झालेल्या प्रभागामध्ये पक्षातील विद्यमान आणि काही इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. मात्र, पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरातील भाजपचे बालेकिल्ले समजण्यात येणाऱ्या प्रभागातून पक्षाने स्थानिक उमेदवारांनाच संधी द्यावी, आमच्या प्रभागात उमेदवार लादू नये, अशी मागणी प्रभागातील नागरिक आणि कार्यकर्त्यांंनी लावून धरल्याने बालेकि ल्ल्यावर लक्ष ठेवून असणाऱ्या इच्छुकांचे धाबे दणाणले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागताच भाजपमधील इच्छुक कामाला लागले आहे. सत्ताधारी पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाला नाकारले जाणार या चर्चेला सुरुवात झाली आहे. अनेक विद्यमान सदस्यांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे किंवा त्यांचा प्रभाग दुसऱ्या प्रभागात गेल्यामुळे त्यांनी शेजारच्या प्रभागात निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. मात्र, नुकत्याच पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ३८ पैकी ३१ प्रभागात बाहेरचा उमेदवार न देता प्रभागातील स्थानिक उमेदवार देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई आणि दिल्लीच्या सर्वेक्षकांकडून शहरात वेगळे सर्वेक्षण सुरू आहे. पक्ष पातळीवर मात्र काही पदाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण सुरू केले असून त्यात हा बाहेरचा उमेदवार प्रभागात लादू नये, अशी मागणी कार्यकत्यार्ंकडून केली जात आहे. अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी शेजारच्या प्रभागात तयारी सुरू केली असताना त्यांच्यासमोर आता उमेदवारी मिळविण्याचे मोठे आव्हान समोर उभे झाले आहे.

शहरात पूर्व, मध्य, दक्षिण, पश्चिम आणि दक्षिण पश्चिम नागपुरात काही प्रभाग हे भाजपचे बालेकिल्ले मानले जात असून स्थानिक उमेदवार देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. अशा स्थानिक उमेदवारांची चाचपणी पक्षाने सुरू केली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे बालेकिल्ले असलेल्या प्रभागामध्ये महाल, रेशीमबाग, नंदनवन, गांधीबाग, वर्धमाननगर, हनुमाननगर, शिवाजीनगर, लक्ष्मीनगर, गोकुळपेठ, धरमपेठ, रामदासपेठ, धंतोली, महाराजबाग, वायुसेनानगर, नरेंद्रनगर इत्यादी प्रभागाचा समावेश आहे. किमान ३८ प्रभागांपैकी ३१ ठिकाणी स्थानिक उमेदवार दिले तर कोणाची निवडून येण्याची शक्यता आहे याची चाचपणी पक्षाच्या वतीने घेण्यात येत आहे. या प्रभागामध्ये भाजपचा विजय हमखास मानला जातो. त्यामुळे अनेक बाहेरच्या नेत्यांचे लक्ष या प्रभागातून उमेदवारी मिळण्याकडे असते. यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच मोर्चेबांधणीलाही सुरुवात झाली आहे. शहरातील काही प्रभागातील नगरसेवकांनी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकसंपर्क ठेवल्यामुळे भाजपचा हा गड अधिकाअधिक भक्कम होण्यास मदत झाली. त्यामुळेच वॉर्डाच्या बाहेरील नेत्यांची या प्रभागावर नजर पडली. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते अस्थवस्थ झाले असून त्यांनी स्थानिक उमेदवाराचा आग्रह धरला आहे. यासाठी प्रभागातील कार्यकर्त्यांच्या बैठकीही घेतल्या जात असून त्यात कोअर कमिटीकडे सामूहिकपणे स्थानिक उमेदवारांची मागणी लावून धरण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला. प्रभाग रचनेत काही वॉर्डाचे संपुष्टात आलेले अस्तित्व आणि आरक्षणामुळे बेघर होण्याची आलेली वेळ यामुळे भाजपतील अनेक दिग्गज सध्या सुरक्षित वॉर्डाच्या शोधात आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांना डावलने हे आजच्या घडीला कुठल्याही पक्षासाठी अडचणीचे ठरणारे असल्याने पक्ष नेतृत्वापुढे पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत इच्छुकांची नावेही बाहेर येत असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी ‘आम्हाला स्थानिक उमेदवारच हवा’ असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मत विचारात घ्यायचे की नेत्यांची ‘सोय’ बघायची असा पेच पक्षापुढे निर्माण झाला आहे.