शिवसेना नेते पंजू किसनचंद तोतवानी यांची कन्या नेहा हिने घरून पलायन करून स्वत:च्या मर्जीने लग्न केले. त्यांच्या लग्नाला विरोध करून मुलगी परत मिळविण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नेहा आणि शशांक चंद्रकार यांच्या लग्नावर शिक्कामोर्तब करून नेहाला नवऱ्यासोबत राहण्याची परवानगी दिली. एक महिन्यापूर्वी उच्च न्यायालयात अमरावती जिल्ह्यातील हिंदू मुलगी आणि मुस्लीम मुलाच्या प्रेम विवाहालाही अशीच परवानगी दिली होती. आज दुसऱ्यांदा नागपूर खंडपीठात प्रेमाचा विजय झाला.
नेहा (१९) रा. सिंधी कॉलनी, खामला ही संताजी महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिकत होती. दरम्यान तिचा चुलत भाऊ मनीष उर्फ गोलू तोतवानी हा एमबीए अभ्यासक्रमाला होता. एमबीए करीत असताना त्याचा परिचय शशांक ऋषीकुमार चंद्रकार (२५) रा. सराई चौकी पंचाईत, उताई, जि. दुर्ग (छत्तीसगढ) याच्याशी झाला. गेल्या तीन चार वर्षांपासून शशांक हा प्रतापनगर परिसरात एका फ्लॅटवर भाडय़ाने राहत होता. दरम्यान तो तोतवानी यांच्याच घरी राहायला गेला. त्यादरम्यान शशांक आणि नेहाचे प्रेमसंबंध जुळले. घरच्यांना त्यांच्या प्रेमाचा संशय आला. परंतु जाती व्यवस्था आणि शशांकविरुद्ध गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या लग्नाला विरोध होऊ लागला. त्यामुळे २ जुलै २०१५ रोजी दुपारी २.३० वाजता नेहा आपल्या आईला ब्युटीपार्लरमध्ये जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर ती घरीच परतली नाही. त्यामुळे नेहाच्या आईने तिचे वडील पंजू तोतवानी यांना भ्रमणध्वनीवर मुलगी घरी न परतल्याची माहिती दिली. त्यामुळे पंजू तोतवानी यांनी नातेवाईक प्रकाश तोतवानी यांना हकीकत सांगितली. सर्व परिसरातील सदस्यांनी चौकशी केली असता नेहा शशांकसोबत पळून गेल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात शशांकविरुद्ध अपहरणाची तक्रार नोंदविली. परंतु पोलीस प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याच्या संशयानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मुलीला न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांना निर्देश देण्याची विनंती केली. त्यावर उच्च न्यायालयाने ९ जुलै २०१५ रोजी नागपूर पोलीस आणि शशांकला नोटीस बजावनू मुलीसह न्यायालयात हजर होण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज नेहा आणि शशांक उच्च न्यायालयात हजर झाले. या प्रकरणाची सुनावणी न्या. भूषण गवई आणि न्या. प्रसन्न वराळे यांच्यासमक्ष कक्षात झाली. यावेळी मुलामुलींनी सांगितले की, ते सज्ञान असून त्यांनी मर्जीने २ जुलै २०१५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता दुर्ग येथील आर्य समाज मंदिरात लग्न केले. त्यानंतर नेहाने आपल्याला नवरा शशांकसोबतच राहायचे असून आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाने नेहाचे म्हणणे ग्राह्य धरून तिला शशांकसोबत राहण्याची परवानगी दिली.

पोलिसांना नोटीस : पंजू तोतवानी यांच्या तक्रारीनंतर प्रतापनगर पोलिसांनी शशांक चंद्रकार याच्याविरुद्ध मुलीला फूस लावून पळवून नेण्यासंदर्भात भादंविच्या ३६३ कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. आज नेहा आणि शशांक यांचे लग्न वैध ठरल्यानंतर शशांकच्या वकिलांनी त्याच्याविरुद्ध प्रतापनगर पोलिसांत दाखल गुन्हा रद्द करण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने प्रतापनगर पोलिसांना नोटीस बजावली असून चार आठवडय़ात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. पंजू तोतवानी यांच्यातर्फे अ‍ॅड. उदय डबले, शशांक चंद्रकारच्या वतीने अ‍ॅड. अशोक भांगडे आणि अ‍ॅड. सुदीप जयस्वाल आणि सरकारच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील एम. जे. खान यांनी बाजू मांडली.

शशांक-नेहाला सुरक्षा : शशांकने छत्तीसगढ उच्च न्यायालयातून सुरक्षा घेतली होती. छत्तीसगढ येथून ते आज सकाळी नागपुरात दाखल झाले. दुर्ग-नागपूर प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत छत्तीसगढ राज्याचे चार बंदुकधारी पोलीस आणि साध्या वेशातील दोन पोलीस होते.