मिहानसाठी गुंतवणूकदारांची परिषद

राज्याची उपराजधानी नागपूर हे गुंतवणूकदारांचे आकर्षणाचे केंद्र म्हणून अतिशय गतीने उदयास येत असून शासनाने  नागपूरला फार्मा क्लस्टर म्हणून विकसित करण्याचे ठरवले आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित गुतंवणूकदारांच्या परिषदेत सांगितले.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने आयोजित नागपूरच्या  मिहानमधील औषध उद्योगासाठी गुंतवणूकदार संवादात्मक परिषदेत ते बोलत होते. यावेळी मिहान-सेझमध्ये औषध निर्माण करणाऱ्या तब्बल १३ कंपन्यांशी सामंजस्य करण्यात आला आहे. यात शालिना लॅब प्रा.लि., टोरेन्ट फार्मा, वेल्स फार्मा, केयूर फार्मा, एसजी फार्मा, निकिता केमिकल्स, झिनलॅब लॅब्ज, स्नेहल फार्मास्युटिकल्स, बीडीएच इंडस्ट्रिज, सिद्धायू आयुर्वेद, एसके  लॉजेस्टिक, आर्का लाईफ सायन्सेस आणि इतरांचा समावेश आहे. या करारांमुळे भविष्यात नागपूर औषध निर्माण हब होण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाला अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री  मदन येरावार, महादेव जानकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

रखडलेल्या मिहान प्रकल्पाला चालना देण्यासाठी विद्यमान सरकारने वेळोवेळी प्रयत्न केले आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे आज मुंबईत झालेली ही गुंतवणूकदारांची परिषद आहे.

अनेक उद्योजकांनी मिहानमध्ये जागा घेतली असली तरी अद्याप उद्योग सुरू केले नाही. त्यामुळे शासनाची अडचण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर आज झालेल्या गुंतवणूकदारांच्या परिषदेने सकारात्मक चित्र निर्माण  होईल, अशी आशा आहे.

आज नागपूर हे गुंतवणूकदारांचे आकर्षणाचे केंद्र म्हणून अतिशय गतीने उदयास येत आहे. आम्ही नागपूरला फार्मा क्लस्टर म्हणून विकसित करण्याचे ठरवले आहे. रेल्वे आणि पोर्ट कनेक्टिव्हीटी सुद्धा उपलब्ध होत आहे. इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून परवानगी सुद्धा गतीने प्राप्त होत आहे.’’

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री