News Flash

नागपूरला सर्वोत्तम शहर करणार

फडणवीस यांनी गुरुवारी नागपुरात महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गर्जना; काँग्रेस ही बुडती बँक

२०१९ पर्यंत नागपूरला मॉडेल शहर म्हणून विकसित करण्यात अपयश आल्यास मतदारांना तोंड दाखवणार नाही, अशी  गर्जना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयताळा येथील निवडणूक प्रचार सभेत केली.

फडणवीस यांनी गुरुवारी नागपुरात महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. जयताळा, सुभाषनगर तसेच इतर तीन ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या. जयताळ्याच्या सभेत बोलताना त्यांनी नागपूर शहर २०१९ पर्यंत देशातील सर्वोत्तम शहर म्हणून विकसित करण्याचा संकल्प व्यक्त केला व तसे करण्यात अपयश आल्यास नागपूरकरांना चेहरा दाखवणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.

केंद्र, राज्य आणि महापालिका यांच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावर शहराचा चेहरामोहराच बदलणार असून हे शहर बघायला देशभरातील लोक येतील, असा दावाही त्यांनी केला.

फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसवर हल्लाबोल केला. मत हे पाच वर्षांची मुदतठेव आहे. ही मुदत ठेव चुकीच्या बँकेत (पक्षात) ठेवू नका. काँग्रेस ही बुडलेली बँक आहे. या बँकेत राहुल गांधी, विलास मुत्तेमवार आणि विकास ठाकरे आहेत. त्यात मुदतठेव जमा केल्यास ते व्याज तर देणार नाहीच पण मूळ रक्कम देखील परत करणार नाहीत.

आमच्या बँकेत पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी, मी स्वत: आहे. या बँकेत तुम्हाला भरपूर परतावा मिळेल, असेही ते म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेत्यांवर शाई फेक प्रकरण आणि तिकीट वाटपावरून झालेली भांडणे या मुद्यांवरून फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.  काँग्रसेची सत्ता केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत देखील नाही. परंतु यांच्यातील भांडणे काही संपत नाहीत. भांडणे हा या पक्षाचा एकमेव कार्यक्रम आहे.

काँग्रेस प्रत्येक निवडणुकीत जमिनीचे पट्टे देऊ असे आश्वासन देते. परंतु कधीचे दिले नाही. वास्तविक त्यांची पट्टे देण्याची प्रवृत्ती नाहीतर सरकारी, खासगी जमिनी हडपण्याची प्रवृत्ती आहे, अशी टीका त्यांनी केली.

शिवसेनेवर टीका

शिवसेनेवरही फडणवीस यांनी टीका केली. मुंबई महापालिकेचा ३६ हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे. नागपूर महापालिकेचा १२०० कोटींचा आहे. नागपूर महापालिका सांडपाण्याचे पुनर्चक्रीकरण योग्य प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करते. त्याउलट एवढा मोठा अर्थसंकल्प असून देखील मुंबईत सांडपाणी नाल्यात आणि समुद्रात सोडण्यात येते. येत्या पाच वर्षांत नागपूर शहरातील १०० टक्के सांडपाण्याचे पुनर्चक्रीकरण केले जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

गडकरी यांनी कार्गो सुरू केले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिहानमधील कार्गो हब सुरू केले. त्यानंतर काँग्रेसचे सरकार १५ वर्षे होते. या पंधरा वर्षांत त्या सरकारने हे काम पुढे नेले नाही, नाही असा दावा करून फडणवीस यांनी  कार्गो हबचे काम लवकरच सुरू करण्यात येईल आणि तीन ते चार वर्षांत काम पूर्ण केले जाईल. पाच वर्षांत ५० हजार लोकांना नोकऱ्या देण्यात येतील, या नितीन गडकरी यांच्या दाव्याचा पुनरुच्चार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 12:32 am

Web Title: nagpur elections 2017 devendra fadnavis
Next Stories
1 मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचारगाणी
2 कुष्ठरोग शोधपथक निवडणुकीच्या कामात
3 पर्यावरणाकडे होणाऱ्या दुर्लक्षावर आसूड, शहराच्या अत्याधुनिकीकरणाचे कौतुकही
Just Now!
X