१२७ ग्रा.पं. निवडणुकीचे निकाल जाहीर; काँग्रेसचा ८३ तर भाजपचा ७३ ग्रा.पं.जिंकल्याचा दावा

नागपूर : जिल्ह्य़ातील १२७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर होताच भाजप व काँग्रेसकडून विजयी उमेदवारांच्या आकडय़ांचा खेळ सुरू झाला. दोन्ही पक्षांनी जिल्ह्य़ात सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला. सरपंचपदाची सोडत निघाल्यावर हा खेळ पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.

जिल्ह्य़ातील रामटेक, कामठी, सावनेर, हिंगणा, उमरेड व काटोल या सहाही विधानसभा मतदारसंघातील १२७  ग्रामपंचायतींच्या १,०८६ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. एकूण ३,०१५ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्य़ात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. ७४ टक्के मतदान झाल्याने निकालाकडे सर्वाचे लक्ष  लागले होते.

सोमवारी सर्व तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली.  उमेदवार कुठल्याही पक्षाच्या चिन्हांवर निवडणूक लढले नसल्याने निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागताच विजयी उमेदवार हा आपल्याच पक्षाच्या समर्थित गटाचा असल्याचा दावा काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीकडून केला गेला. त्यामुळे निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायतींपेक्षा (१२७) तीनही राजकीय पक्षांनी जिंकल्याचा दावा केलेल्या ग्रा.पं.ची संख्या कितीतरी अधिक ठरली.

भाजपने १२७ पैकी ७३ ग्रा.पं.वर तर काँग्रेसने १२७ पैकी ८३ ग्रा.पं. वर पक्षाचे समर्थित गट विजयी झाल्याचा दावा केला. राष्ट्रवादीने २२ जागा जिंकल्याचे कळवले. सेनेकडून अधिकृतपणे आकडे प्रसिद्धीस देण्यात आले नाही. वंचित बहुजन आघाडीनेही या निवडणुकीत खाते उघडले  आहे. काँग्रेस आणि भाजपने जिंकलेल्या जागांची यादी स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली. निवडणुकीनंतर आता सरपंच आरक्षण सोडत काढली जाईल. त्यानंतरच सरपंचपदी कोण बसणार, याची उत्सुकता लागली आहे. जिल्ह्य़ातील प्रमुख नेते अनुक्रमे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या काटोल मतदारसंघात, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी त्यांच्या सावनेर मतदारसंघात, भाजप नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी तालुक्यात, हिंगण्याचे भाजप आमदार समीर मेघे यांनी त्यांच्या हिंगणा तालुक्यात तर उमरेडचे  काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी उमरेड तालुक्यात आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपच्या यशासाठी केलेली  व्यूहरचना पक्षाच्या जागा वाढवण्यास कारणीभूत ठरली आहे.

राष्ट्रवादीचा दावा

गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यात सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा पक्षाच्यावतीने करण्यात आला.  काटोल तालुक्यातील तीनही ग्रामपंचायतीवर तर नरखेड तालुक्यातील १७ पैकी १६ ग्रामपंचायतीवर विजय मिळवल्याचा दावा राष्ट्रवादीने केला. काटोल तालुक्यातील भोरगडमध्ये ९ पैकी ९, खंडाळ्यात ७ पैकी ७, चनकापूर-माळेगावमध्ये ९ पैकी ८, नरखेड तालुक्यात जलालखेडा येथे १३ पैकी १०, थडीपवनी येथे ९ पैकी ९ , महेंद्री ७ पैकी ६, खैरगाव १३ पैकी १०, सिंजर  ७  पैकी ५, अंबाडा ९ पैकी ७, सायवाडा ९ पैकी ६ जागा जिंकल्या तर, मदना येथे राष्ट्रवादी व शिवसेना मिळून ९ पैकी ९ ही जागेवर विजय प्राप्त केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला.

भाजपचा दावा

भाजपने जिल्ह्य़ातील १२९ ग्रा.पं.पैकी ७३ ग्रा.पं. वर भाजप समर्थित गटाचा विजय झाल्याचा व यापैकी ६५ ग्रा.पं.मध्ये स्पष्ट बहुमताचा दावा केला. यापैकी  काटोल मतदारसंघात २२ ग्रा.पं. पैकी ९, कामठीत १९ पैकी १२, रामटेकमध्ये २० पैकी ६, उमरेडमध्ये ४१ पैकी ३२, हिंगणा १० पैकी ३ ग्रामपंचायतीत भाजप समर्थित गट बहुमतात आहे, जिल्ह्य़ात ६५२ सदस्य  भाजप समर्थित  आहेत, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष  अरविंद गजभिये  यांनी  कळवले.

काँग्रेसचा दावा

१२७ ग्रामपंचायतींपैकी  काँग्रेसने ८३ जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस १४ , शिवसेना ५, भाजप २५ तर अपक्षांनी २ जागेवर विजय मिळवला, असा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केला. पक्षाचे नेते व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर विधानसभा मतदारसंघात १२ पैकी सर्व ठिकाणी, कळमेश्वर तालुक्यात सेलू-गुमथळा, सावंगी-घोगली, सोनेगाव-पोही, कोहळी-मोहळी येथे काँग्रेस समर्थित गट विजयी झाले. तालुक्यातील ४५ सदस्यांपैकी ३७ सदस्य काँग्रेस गटाचे, तर केवळ आठ सदस्य भाजप गटाचे विजयी झाल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

जिल्ह्य़ात भाजपच्या बडय़ा नेत्यांच्या गावात पक्षाच्या समर्थित गटाचा पराभव झाला. ग्रामीण भागातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पुन्हा एकदा काँग्रेसवरच विश्वास व्यक्त केला आहे.

– राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

ग्रामपंचायत निवडणुकीत  जनतेने महाविकास आघाडीला सपशेल नाकारल्याचे चित्र  निकालातून दिसले आहे.

– अरविंद गजभिये, जिल्हाध्यक्ष, भाजप