घटस्फोटाच्या प्रकरणात उच्च न्यायालयाचे निरीक्षण

घटस्फोटांच्या प्रकरणात नेमलेल्या वकिलाने पक्षकाराला विविध सुनावणींची माहिती देणे आवश्यक आहे. वकिलांनी पक्षकाराला माहिती न दिल्यामुळे घटस्फोटाच्या प्रकरणात एकतर्फी निकाल लागला. वकिलाने पक्षकाराला माहिती न पुरविल्याने पक्षकार न्यायालयात हजर होऊ शकले नाही आणि वकीलही गैरहजर राहिले. त्यामुळे वकिलाच्या चुकीचा फटका घटस्फोटाच्या रूपाने पक्षकाराला बसला. वकिलाच्या चुकीचा फटका पक्षकाराला बसू नये, कौटुंबिक न्यायालयाने प्रकरणाची पुन्हा सुनावणी घ्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.

अंकिता (नाव बदललेले) ही भुसावळ येथील रहिवासी असून २६ एप्रिल २००९ ला तिचा विवाह नागपूरकर रहिवासी होमेश (नाव बदललेले) याच्याशी झाला. लग्नानंतर मुलगी पती आणि त्याच्या कुटुंबीयांसह नागपुरातील पार्वतीनगर परिसरात राहू लागली. दरम्यान, पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कलह निर्माण झाला. पती पत्नीला टोमणे मारू लागला, तर पत्नी ही घरातील काम करीत नाही म्हणून आरोप होऊ लागले. पतीवर तिने हुंडा मागण्याचा आरोप केला, तर होमेशने तिच्या चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले. १९ ऑक्टोबर २००९ ला अंकिता आणि तिच्या सासूचे कडाक्याचे भांडण झाले आणि त्या दिवशी ती घर सोडून माहेरी निघून गेली.

दरम्यान, अंकिताने भुसावळ येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम १२५ अंतर्गत पोटगीसाठी अर्ज केला. त्या अर्जावर सुनावणी होत असताना प्रकरण समुपदेशनासाठी गेले. त्या ठिकाणी दोघांमध्ये एकत्र राहण्यावर सहमती झाली. त्या आधारावर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी ती याचिका निकाली काढली. त्यानंतर पतीने तिला नांदवण्यास नकार देत न्यायालयात दिलेल्या आश्वासनाचे उल्लंघन केले. त्यानंतर त्याने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका केली. या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. मात्र, सुनावणीवेळी अंकिता ही नागपूरपासून ४५० कि.मी. अंतरावर भुसावळ येथे राहायची. तिला प्रत्येक सुनावणीची माहिती नव्हती. वकिलांनीही तिला माहिती दिली नाही किंवा वकीलही गैरहजर होते. पुरावे तपासण्यासाठी अंकिता किंवा तिचे वकील सतत गैरहजर असल्याने कौटुंबिक न्यायाधीशांनी एकतर्फी निर्णय दिला आणि होमेशची घटस्फोटाची विनंती मान्य केली. याची माहिती मिळताच अंकिताने उच्च न्यायालयात धाव घेतली. तिच्या अपिलावर न्या. वासंती नाईक आणि न्या. इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

पत्नीला संधी मिळणे आवश्यक

पत्नी ही भुसावळला राहात होती. नागपूर-भुसावळ अंतर खूप आहे. त्यामुळे वकिलांनी तिला प्रकरणाच्या सुनावणीची माहिती देणे आवश्यक होते. मात्र, तिला ती देण्यात आली नाही. त्यामुळे ती पतीची साक्ष नोंदविणे असो किंवा स्वत: साक्षीस हजर राहू शकली नाही. एकंदर दस्तावेजावरून अनेक सुनावणीस ती आणि तिचे वकील गैरहजर होते. त्यामुळे वकिलांच्या चुकीचा फटका तिला बसता कामा नये. तिला एक संधी मिळायला हवी. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने प्रकरणाची पुन्हा सुनावणी घ्यावी आणि नव्याने निर्णय घ्यावा, असे आदेश दिले.