केंद्रीय नगर विकास खात्यातर्फे नवी दिल्ली येथे आयोजित ‘अर्बन मोबेलिटी इंडिया एक्स्पो’मध्ये नागपूर मेट्रो रेल्वे कंपनीने आपला स्टॉल लावला आहे. या प्रदर्शनाचे हे आठवे वर्षे असून त्यात दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशन, मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशन यांच्यासह इतरही मोठय़ा कंपन्यांनी भाग घेतला आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रथमच या प्रदर्शनात सहभागी झाली आहे.

मेट्रो रेल्वे डब्याचा आकार असणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वेचा स्टॉल प्रदर्शनाचे आकर्षक केंद्र ठरले असून यात प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य मंत्री बाबूल सुप्रियो उपस्थित होते. या मंत्र्यांनी मेट्रोच्या स्टॉलला भेट दिली. त्यांचे स्वागत व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले.
प्रकल्पाच्या कामाच्या गतीबाबत दोन्ही मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. स्टॉलला मुंबई मेट्रो रेल्वे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, केंद्रीय नगर विकास खात्याचे अतिरिक्त सचिव दुर्गाशंकर मिश्रा, सचिव मधुसूदन प्रसाद, सहसचिव शशी वर्मा, मुकुंद सिन्हा यांच्यासह इतरही मान्यवरांनी भेटी दिल्या.