क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू भोगताहेत नरक यातना; लोकसत्ताच्या प्रत्यक्ष पाहणीत धक्कादायक वास्तव उघड

मानकापूर येथील निवासी क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंसाठी चक्क शौचालयाच्या पाण्याने अन्न शिजवले जात जाते. जेवणाच्या ताटावर माशांचा झुंड बसलेला असतो. तुटलेल्या खिडक्या आणि निकामी कुलर हे तर जणू या प्रबोधिनीची ओळखच झाले आहेत. लोकसत्ताच्या प्रत्यक्ष पाहणीत हे धक्कादायक वास्तव उघड झाले.

कोराडी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुल परिसरात महाराष्ट्र शासनाची निवासी क्रीडा प्रबोधिनी आहे. येथे राज्यातून हॅण्डबॉल आणि अ‍ॅथलेटिक्सचे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षण घेत असतात. येथे सध्या हॅण्डबॉलचे ३२ तर अ‍ॅथलेटिक्सचे सहा खेळाडू राहतात, परंतु या खेळाडूंच्या भविष्याशीच खेळ सुरू आहे. या नरक यातनेतून सुटका मिळावी, यासाठी खेळाडूंनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली आहे. चार माळ्याच्या या प्रबोधिनीची पहिली पायरी चढताच भटक्या कुत्र्यांचे दर्शन घडते. पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या खोल्या आहेत. खोल्यांमध्ये तुटलेल्या खिडक्या आणि निकामी कुलर्स दिसतात. प्रत्येक माळ्यावर शौचालय आहेत. मात्र, केवळ नावापुरते. शौचालयाचे दारे तुटली असून काहींच्या खिडक्या गायब आहेत. सर्वात खालच्या माळ्यावर भोजन कक्ष आहे. येथे शौचालयाच्या नळातून पाणी घेऊन अन्न शिजवले जात होते. सर्वत्र दरुगधी आणि माशांचा वावर दिसून आला. विशेष म्हणजे, महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार, खेळाडूंसाठी दररोज जेवणाचा आणि नाश्त्याचा मेन्यू तयार करून दिला आहे. त्याप्रमाणे त्यांना भोजन देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असते आणि त्यावर प्रबोधिनीच्या प्राचार्याचे नियंत्रण असते. मात्र मेन्यूप्रमाणे जेवण मिळत नाही, असे येथील खेळाडूंनी सांगितले. भोजनकक्षाच्या शेजारी मोठय़ा खोलीत स्वयंपाकघर असून येथे सर्वत्र अस्वच्छता आहे. शेजारच्या खोलीत सडके कांदे पडले आहेत. नुकतीच पाण्याची टाकी स्वच्छ केली तेव्हा त्यामधून मोठय़ा प्रमाणात शेवाळ निघाले. जिमचे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे आणि त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, जीममध्ये शौचालयाचे पाणी गळत असल्याने दरुगधी पसरली आहे.

आम्ही तक्रार केली नसती पण..

क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू सांगतात, आम्ही अनेक महिन्यांपासून अशा परिस्थितीत राहत आहोत. अनेकदा प्राचार्याकडे तक्रारी केल्या. मात्र दखल घेतली गेली नाही. दिवसेंदिवस भोजनाचा दर्जा निकृष्ट होत असल्याने अखेर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली. योग्य भोजनाअभावी आमच्या खेळावर परिणाम जाणवत होता. शिवाय दरुगधीमुळे झोपदेखील लागत नव्हती.