काँग्रेस सदस्यांची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक राज्यकारभार या वाक्याचा राज्यात चांगलाच प्रभाव असल्याचा प्रत्यय नागपूर महापालिकेत आला. आर्थिक निर्णयाला मंजुरी देणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत पारदर्शकतेचा आग्रह काँग्रेस सदस्यांनी केला. त्यासाठी समितीच्या बैठकीचे चित्रीकरण करण्याची मागणी करण्यात आली.

स्थायी समितीला महापालिकेची तिजोरी समजली जाते. या समितीवर पक्षीय संख्याबळानुसार सदस्य नेमण्यात येतात. ही समिती खर्चाबद्दलचे निर्णय घेत असते. समितीच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या सूचना, विरोधी पक्षाच्या प्रभागातील कामांना देण्यात आलेली मंजुरी यासंदर्भात बैठकीच्या इतिवृत्तामध्ये फेरफार होत असल्याचा आरोप सदस्यांनी समितीच्या बैठकीत केला आणि पारदर्शक कारभारासाठी बैठकीचे चित्रीकरण (व्हिडिओग्रॉफी) करण्याची मागणी केली.

मुंबई महापालिकेत भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर राहावे लागणार हे स्पष्ट झाले. त्यानंतर फडवणीस यांनी महापालिकेत सत्ता स्थापणार नाही, परंतु कारभार पारदर्शक चालावा म्हणून उपलोकायुक्त नेमण्यात येईल, असे स्पष्ट केले.

साहजिकच शिवसेनेच्या त्याला विरोध झाला. मग शिवसेनेने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारदर्शकता आणा, नागपूर महापालिकेत उपलोकायुक्त बसवा, असे प्रतिआव्हान दिले. त्यानंतर हा विषय काही दिवस चघळण्यात आला. नागपुरातील स्थानिक नेते महापालिकेत उपलोकायुक्ताची गरज नाही, असे सांगू लागले. त्यानंतर फडणवीस यांनी हा विषय अलगद बाजूला ठेवला. आता काँग्रेसने महापालिकेतील पारदर्शक कारभार होण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीची व्हिडिओग्रॉफी तयार करण्याची मागणी केली आहे.

स्थायी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त बदलण्यात येतात.

समितीच्या सदस्यांनी ज्या विषयावर हरकत घेतली. त्या विषयावर सदस्यांची संमती असल्याचे इतिवृत्त लिहिले जाते. महापालिकेचे बहुतांश आर्थिक व्यवहाराचे निर्णय स्थायी समिती घेते. समितीचे सदस्य अनेक विषयावर आपले मत मांडतात, परंतु विरोधी पक्षाची भूमिका इतिवृत्तात योग्य प्रकारे येत नाही.

तेव्हा समितीच्या बैठकीची व्हिडिओग्रॉफी करण्यात यावे, हे चित्रीकरण स्थायी समिती सदस्यांना ‘पेन ड्राईव्ह’मध्ये उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी स्थायी समितीमधील काँग्रेस सदस्य मनोज सांगोळे यांनी केली.

‘‘राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे चित्रीकरण होते. मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभार करण्यावर भर आहे, तर मग नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीचे चित्रीकरण का केले जात नाही. पुढील बैठकीचे चित्रीकरण झाले पाहिजे.’’

मनोज सांगोळे, स्थायी समिती सदस्य