थंडीने शहर गारठले :- उपराजधानीसह विदर्भातील सर्व शहरांवर गेल्या दोन दिवसांपासून दाट धुक्यांची चादर कायम आहे. हवेत प्रचंड गारठा असून थंडीपासून बचावासाठी नागरिक दिवसभर ऊबदार व गरम कपडय़ांमध्ये वावरत आहेत. शहरातील किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस इतके असून सर्वाधिक कमी तापमानाची नोंद ब्रम्हपुरी येथे ८.७ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर नागपुरात दोन दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला. त्यानंतर हवेतील गारठा हळूहळू वाढतच गेला. गुरुवारी शहराचे किमान तापमान २०.६ अंश सेल्सिअस इतके होते. शुक्रवारी त्यात ८ अंशाने घट झाली. ब्रम्हपुरी येथील तापमानात ११ अंशाने घट होऊन ते ८.७ अंश सेल्सिअसवर आले. ब्रम्हपुरीपाठोपाठ गोंदिया येथील किमान तापमान देखील १०.५ अंश सेल्सिअसवर आले आहे. हवेतील गारठा प्रचंड वाढला असून दुपारी घराबाहेर पडणेदेखील कठीण झाले आहे. मात्र, नोकरदारांना पर्याय नसल्याने गरम कपडय़ांची ऊब घेऊनच त्यांना बाहेर पडावे लागत आहे. रस्त्यावर राहणाऱ्यांचे मात्र प्रचंड हाल आहेत. बांधकामावर असणारे मजूर, सुरक्षा रक्षक, झोपडपट्टीत राहणाऱ्यांना शेकोटय़ांच्या ऊबेशिवाय पर्याय नाही. एरवी रात्री १२ वाजेपर्यंत माणसांनी गजबजलेल्या रस्त्यांवर सायंकाळपासूनच शांता जाणवू लागली आहे. रात्री केवळ शेकोटय़ांचा प्रकाश तेवढा दिसत आहे.