५० आंतरिक गुण महाविद्यालये देणार; १ ते १८ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन परीक्षा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने अंतिम वर्षांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या बहुपर्यायी पद्धतीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना १ तासात ५० पैकी केवळ २५ प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण या पद्धतीने ही परीक्षा केवळ ५० गुणांची असून उर्वरित ५० गुण हे महाविद्यालयांकडून आंतरिक गुण म्हणून विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. मुळात विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी ३५ गुणांची गरज असते. त्यामुळे महाविद्यालयांच्या हातात असलेल्या ५० आंतरिक गुणांमधून विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची पूर्ण निश्चिती असल्याने परीक्षेत कुठलीही काठिण्य पातळी न ठेवता नागपूर विद्यापीठाने परीक्षेच्या नावावर विनोदच केल्याचे बोलले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व राज्य शासनाकडून आलेल्या शिफारशीची परीक्षा मंडळ व विद्वत परिषदेमध्ये चर्चा करून नागपूर विद्यापीठाने परीक्षा पद्धतीची आखणी केली आहे. यानुसार ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. मूळ परीक्षापद्धतीमध्ये ८० गुणांचा पेपर तर २० आंतरिक अशा पद्धतीने १०० गुणांची परीक्षा होते. मात्र, नागपूर विद्यापीठाने ५० प्रश्नांपैकी केवळ २५ प्रश्नांची उत्तरे सोडवणे आणि ५० गुण हे महाविद्यालयांच्या हातात दिल्याने ही केवळ नाममात्र परीक्षा ठरणार आहे.

नागपूर विद्यापीठातर्फे १८० अभ्यासक्रमांची परीक्षा होणार असून ६३ हजार ५०४ नियमित तर ७३७९ अनुत्तीर्ण विद्यार्थी परीक्षा देतील. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा ही १५ सप्टेंबरपासून महाविद्यालय स्तरावर होणार आहे. बहुपर्यायी परीक्षेसाठी विद्यापीठ ११३५ प्रश्नपत्रिका तयार करणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी कुलगुरू डॉ. चौधरी उपस्थित होते.

‘त्यांना’ ऑफलाईनची सोय

ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देणे शक्य नसेल अशांची महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. यासाठी विद्यापीठांकडून तशा सूचना आणि विविध प्रकारचे प्रशिक्षण महाविद्यालयांना दिले जाणार आहे. याशिवाय कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करीत असल्याचे कुलगुरू डॉ. चौधरी यांनी सांगितले.

इतर विद्यापीठांची पद्धत वेगळी

नजीकच्या गोंडवाना विद्यापीठानेही ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असला तरी ९० मिनिटात ९० पैकी ८० प्रश्न सोडवणे विद्यार्थ्यांना अनिवार्य राहणार आहे. प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे ८० गुणांची परीक्षा व २० गुण हे महाविद्यालये देतील. अमरावती विद्यापीठाने परीक्षा पद्धतीची काठीण्य पातळी कायम ठेवली आहे. मात्र, नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेच्या नावावर जणू थट्टाच केली आहे.

परीक्षाबहाद्दरावर नजर

कॉपी करण्याच्या विचाराने काही विद्यार्थ्यांनी एकत्र बसून परीक्षा देण्याचा निर्णय घेतला तरी प्रत्येक विद्यार्थ्यांना येणारे प्रश्न हे भिन्न राहणार आहेत. याशिवाय कुण्या विद्यार्थ्यांनी मोबाईलसमोर बसून उत्तरे सोडवताना काही कालावधीसाठी स्क्रीनपासून दूर गेल्यास विद्यापीठाच्या सव्‍‌र्हरवर त्याची नोंद होणार असून कॉपी पकडली जाणार आहे. त्यामुळे कॉपीबहाद्दरांनी सावधान रहावे, असा इशारा परीक्षा संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांसाठी सूचना

विद्यार्थी पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षेला सामोरे जाणार असल्याने २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान सराव परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे परीक्षा अर्जामध्ये दिलेला भ्रमणध्वनी क्रमांक किमान परीक्षा व निकाल जाहीर होईपर्यंत बदलवू नये, अशा सूचना दिल्या आहेत. विद्यापीठाने विशेष अप्लिकेशन तयार केले आहे. याद्वारे अ‍ॅड्राईड भ्रमणध्वनीवर प्रश्नपत्रिका येणार असून ती डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना सोडवून अपलोड करायची आहे. हे करताना इंटरनेट जोडणी किंवा काही इतर अडचणी आल्यास विद्यापीठ अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देऊन त्या किमान कालावधीमध्ये ती अपलोड करण्याची सुविधा देणार आहे.

परीक्षेचे स्वरूप

*   प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने

*   १ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन परीक्षा.

*   सुट्टीच्या दिवशीही होणार पेपर.

*   बहुपर्यायी पद्धतीच्या परीक्षा पद्धतीचा अवलंब.

*   एका दिवसात चार टप्प्यात होणार परीक्षा.

*   प्रत्येक पेपर एका तासाचा राहणार.

*   विद्यार्थ्यांना ५० प्रश्न दिले जाणार असून यापैकी २५ प्रश्नांची उत्तरे  देणे अनिवार्य.

*   प्रत्येक प्रश्नाला दोन गुण.

*    १५ मार्चपर्यंतच्या अभ्यासक्रमावरच प्रश्न.