विरोधकांच्या शक्तिप्रदर्शनाकडे सरकारचेही लक्ष

तब्बल ३२ वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विधानभवनावर धडकणाऱ्या विरोधकांच्या हल्लाबोल मोर्चाकडे सरकारचीही नजर लागली आहे. शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान आणि विषारी कीटकनाशकांमुळे यवतमाळ जिल्ह्यात गेलेल्या बळींच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारला नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या घटकपक्षांनी या हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे.

गेल्या वर्षी राज्यभरात निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाशी या मोर्चाची तुलना होणार असल्याने विरोधकांनीही जोरदार शक्तीप्रदर्शनासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. शेतकऱ्यांचा मसिहा असल्याचा आव आणणाऱ्या विरोधकांवर शेतकऱ्याचा खरोखरच विश्वास आहे का याचाही या मोर्चाद्वारे निकाल लागणार असल्याने विरोधकांच्या शक्तीप्रदर्शनाकडे सरकारचेही लक्ष असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकार गेल्या तीन वर्षांत सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, नोकरदार, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण कोणीही समाधानी नाही. सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे जनतेत प्रचंड संताप आहे. या संतापाला वाचा फोडण्याचे काम या जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते गुलाम नबी आझाद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. सकाळी १२ वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते दीक्षाभूमीजवळ एकत्र येऊन मोर्चाला सुरुवात करणार आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते धनवटे कॉलेजजवळ एकत्र येऊन विधानभवनाच्या दिशेने मार्गस्थ होतील. त्यानंतर दोन्ही पक्षांचे मोर्चे एकत्रितपणे विधानभवनावर धडकणार आहेत.

दावे-प्रतिदावे

’शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १९८५ नंतर होणारा हा मोर्चा विक्रमी ठरावा यासाठी राष्ट्वादी काँग्रेसने आपल्या बालेकिल्यातून म्हणजेत पुण्याहून खास ट्रेन सोडली आहे. तर आजही राष्ट्रवादीपेक्षा आपण सरस आहोत हे दाखवून देण्यासाठी काँग्रेस पक्षानेही आपली सर्व यंत्रणा कामाला लावली आहे.

’या मोर्चात दोन्ही पक्षांचे सर्व प्रमुख नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या विविध भागांतून येणारे नागरिक असे दीड ते दोन लाख लोक या मोर्चात सहभागी होतील, असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

’विरोधकांच्या मोर्चाला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळणार नाही, कर्जमाफी व अन्य विकास कामांमुळे जनता सरकावर खूश असल्याचा दावा भाजपच्या एका मंत्र्याने केला.या मोर्चाच्या माध्यमातून दोन्ही काँग्रेसची खरी ताकदही दिसून येईल असेही हा नेता म्हणाला.