गुजरात पोलिसांनी गीतांजली एक्सप्रेसमधून ताब्यात घेतले

पाटणापासून ते गुजरातपर्यंत अनेक नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला जहाल नक्षलवादी तुषारकांती भट्टाचार्य यास मंगळवारी गुजरात पोलिसांनी विदर्भातून अटक केली. तुषारकांती हा गीतांजली एक्सप्रेसने कोलकाताहून नागपूरला येत असताना गोंदिया येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. या अटकेमुळे माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला असून त्याची पत्नी प्रा. शोमा सेन यांनी हे अपहरण असल्याचा आरोप केला आहे.

तुषारकांती हा तरुण वयापासून नक्षलवादी चळवळीशी जुळलेला आहे. त्याची पत्नी प्रा. शोमा सेन या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाच्या विभागप्रमुख आहेत. त्यांचे राहणे नागपुरातील भरतनगर परिसरात आहे. तुषारकांती याला २००६-०७ मध्ये पटना पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली होती. त्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर २००७ मध्ये तत्कालीन आंधप्रदेश व विद्यमान तेलंगणा पोलिसांनी त्याला अटक केली होती. तेव्हापासून २०१३ पर्यंत हैदराबाद येथील चेरियापल्ली कारागृहात होता. त्यादरम्यान २०१० मध्ये सुरत जिल्ह्य़ातील कामरेज पोलीस ठाण्यांतर्गत भादंविच्या १२१-अ, १५४ आणि संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत एका कारवाईत अनेक नक्षलवाद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यात प्रामुख्याने जहाल नक्षलवादी श्रीधरन श्रीनिवास आणि वर्णन गोन्सालवीस यांच्यासह तुषारकांतीचे नाव समोर आले होते. तेव्हापासून तुषारकांती हा फरार असल्याचे सांगण्यात आले. २०१३ मध्ये हैदराबाद येथील कारागृहातून बाहेर पडल्यानंतर नागपुरातच वास्तव्याला आहे.

त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी तुषारकांती हा कोलकाता येथे आपल्या बहिणीकडे व कारागृहात असलेल्या भावाच्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गेला होता. तेथून काल सोमवारी तो गीतांजली एक्सप्रेसने नागपूरला परत येत असताना विदर्भातील गोंदिया मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर गुजरात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व खासगी वाहनाने नागपुरात घेऊन आले. त्यानंतर त्याला थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन गेले.

तेथून एका क्रमांकावरून तुषारकांतीला त्याच्या वकिलासोबत बोलण्याची मुभा दिली. त्यानंतर त्याने अ‍ॅड. प्रकाश मेघे यांना संपर्क करून सुरत येथील प्रकरणात गुजरात पोलिसांनी आपल्याला अटक केल्याची माहिती दिली.

त्यानंतर अ‍ॅड. मेघे यांनी डॉ. शोमा सेन यांना ही माहिती कळवली. तुषारकांतीची अटक ही माओवादी चळवळीला मोठा हादरा समजण्यात येत आहे.

हे तर पोलिसांकडून अपहरण

बहिणीच्या घरून परत येत असताना गुजरात पोलिसांनी तुषारकांतीला रेल्वेमधून अटक केली. २०१३ पासून तुषारकांती घरी होता. २०१० मध्ये गुन्हा दाखल होऊन गुजरात पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला तेव्हा तो हैदराबाद कारागृहात होता. त्याला फरार घोषित केले तेव्हा ९ मे २०११ आणि २२ जुलै २०११ ला सूरत येथील खातोर सत्र न्यायालयाला पत्र लिहून आपण फरार नसल्याचे तुषारकांतीने सांगितले होते. त्यावेळी पोलिसांनी त्याला प्रॉडक्सन वॉरंटवर अटक का केली नाही? त्यानंतर आतापर्यंत तो घरी लिखाणाचे कार्य करीत होता. यादरम्यान गुजरात पोलीस आणि एनआयएने अनेकदा घरी येऊन त्याचा तपास केला, परंतु अटक केली नाही. एकटा माणूस रेल्वेगाडीतून प्रवास करीत असताना त्याला बेकायदा ताब्यात घेणे, हे एकप्रकारचे अपहरण आहे, असा आरोप डॉ. शोमा सेन यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्यासोबत प्रसिद्ध लेखक वीरा साथीदार उपस्थित होते.

राजकीय दबावातून प्रा. साईबाबाला शिक्षेची शक्यता

दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू आणि माओवादी प्रा. जी. एन. साईबाबा यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत. तरीही त्यांना शिक्षा झाली. अनेकदा राजकीय नेत्यांवर राजकीय दबावातून पुराव्यांची मोडतोड करून विरोधकांना कारागृहात डांबण्यात येते. याचे अनेक उदाहरणे आहेत. प्रा. साईबाबाच्या प्रकरणातही राजकीय दबावातून शिक्षा ठोठावण्यात आली असावी, असा आरोप डॉ. शोमा सेन यांनी केला.  प्रा. साईबाबाच्या बचावासाठी तुषारकांती आणि आपण प्रयत्न केल्याने सरकारकडून आपल्याला लक्ष्य करण्यात येत आहे, असेही डॉ. सेन म्हणाल्या.

शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीतही सहभाग

कारागृहात बाहेर पडल्यानंतर २०१३ पासून तुषारकांतीने आपल्या कामाची पद्धत बदलली होती. समाजाच्या विविध विषयांवर लेखन करणे आणि माओवादी चळवळीसाठी मनुष्यबळ निर्माण करण्याची मोठी जबाबदारी तो पार पाडत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याने शेतकऱ्यांमधील असंतोषाला खतपाणी घालण्यासाठी सुकाणु समितीच्या कार्यक्रमातही तो सहभागी झाला होता. नुकत्याच जुलै महिन्यात झालेल्या सुकाणू समितीच्या वर्धा येथील कार्यक्रमात तो सहभागी झाला होता आणि तेथे त्याने भाषणही केले होते.