यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक तरुण आमदार विधिमंडळात निवडून आले आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख हेदेखील आहेत. “एखाद्या आमदाराने सभागृहात भाषण करायच म्हटल्यावर त्यासाठी तयारी करावे लागते. पण यामध्ये पहिल्यांदा निवडून आलेले, धीरज यांचे कालचे भाषण पाहून, मला विलासराव देशमुख यांची आठवण झाली. कारण सभागृहात विलासराव भाषण करताना हात वारे आणि त्यांचा आवाज हे सर्व हुबेहुब धीरज यांच्यामध्ये पाहण्यास मिळालं,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार अजित पवार यांनी केलं.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पत्रकारांच्या सुयोग या निवासस्थानी भेट दिली. तसंच त्यांच्याशी दिलखुलासपणे संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरंही दिली. यावेळी त्यांनी युवा आमदार आदित्य ठाकरे यांच्याबाबतही भाष्य केलं.

“गेल्या महिनाभरात अनेक वेळा महाविकासआघाडीच्या नेत्यांची आणि मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या आहे. त्या बैठकांना आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित राहिले होते. वरिष्ठ सभासदांशी आदरानं बोलणे आणि त्यांना सन्मान देणं,” असे अनेक गुण त्यांच्यात पहायला मिळाल्याचं पवार म्हणाले. “एका बाजूला प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा वारसा लाभलेला असताना मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे, असं त्यांच्यामध्ये आजपर्यंत दिसून आले नाही. प्रत्येक वेळी त्यांच्यात एक साधेपणा पाहण्यास मिळाला आहे. त्याचबरोबर तीन ही पक्षातील नेत्यांसोबत मिळून, मिसळून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही चांगली गोष्ट आदित्य यांच्याकडे आहे,” असं त्यांनी सांगितलं.