राजेश्वर ठाकरे

भारतीय नियंत्रक व लेखा परीक्षकांनी (कॅग)ने अखर्चित निधीबद्दल फडणवीस सरकारवर ठेवलेल्या ठपक्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अंर्तगत मतभेद असल्याचे आज चव्हाटय़ावर आले.

कॅगने फडणवीस सरकारच्या ६५ हजार कोटींहून अधिक रकमेच्या खर्चावर आक्षेप नोंदवला आहे. या  अहवालाचा आधार घेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत फडणवीस सरकार घोटाळयाचा आरोप केला.

फडणवीस यांनी आज त्यावर स्पष्टीकरण दिले. ज्यांना राज्याच्या आर्थिक जमा-खर्चाची माहिती आहे. ते असा आरोप करू शकत नाहीत. निधी खर्च झाला पण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र घेतले नाही. ही केवळ तांत्रिक बाब आहे. जयंत पाटील यांनी देखील ही तांत्रिक बाब असल्याचे मान्य केले. पाटील म्हणाले, यास घोटाळा म्हणता येणार नाही. आता आपण सत्तेत आलो. आपल्या सदस्यांनी असे आरोप करण्याचे टाळावे.

यावर  त्यांच्याच पक्षाचे नवाब मलिक भडकले. प्रत्येक सदस्याला आपले मत मांडण्याचा  अधिकार आहे. कॅगने आक्षेप घेतल्यानंतर तो विषय लोकलेखा समितीकडे जातो. तेथे काय ते सत्य समोर येईल, असेही मलिक म्हणाले.  दिलीप वळसे पाटील यांनी भाजपचे लोक अशाच प्रकारच्या अहवालांचा आधार घेत आरोप करीत असल्याचे लक्षात आणून दिले.