उपमहापौर म्हणून निवड झालेले सतीश होले हे विद्यापीठातील कर्मचारी म्हणून वेतन उचलत असताना नगरसेवक म्हणूनही मिळणारे मानधन घेत असल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
भाजप्रणीत नागपूर विकास आघाडीने दक्षिण नागपुरातील रघुजीनगर येथील नगरसेवक सतीश होले यांची सोमवारी उपमहापौर म्हणून निवड केली आहे. त्यांची निवड होताच त्यांच्या अपत्रातेविषयी जोरदार चर्चा रंगू लागली आहे. सतीश होले हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कर्मचारी आहेत. ते विद्यापीठातील आरोग्य केंद्रावर कंपाऊंडर म्हणून सेवारत आहेत. तसेच गेल्या पंधरा वर्षांपासून नगरसेवक आहेत. ते विद्यापीठाचे कर्मचारी म्हणून वेतन घेत आहेत. शिवाय पंधरा वर्षांपासून नगरसेवकांना मिळणारे मानधनही उचलत आहेत. कायद्यानुसार एक व्यक्ती दोन ठिकाणीचे वेतन घेऊ शकत नाही. शासकीय कर्मचाऱ्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. परंतु त्यासाठी त्याला आपल्या आस्थापनाची परवानगी आणि धारणाधिकार (लीन) घेणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर जनतेच्या सेवेत असल्याने त्या काळात ती व्यक्ती सुटीवर असते. त्यामुळे दोनपैकी एकाच ठिकाणाचे वेतन उचलणे बंधनकारक आहे. दोन्हीकडील वेतन घेता येत नाही. परंतु होले यांनी गेली पंधरा वर्षे नगरसेवकाचे मानधन आणि विद्यापीठाचे कर्मचारी म्हणून वेतन उचलल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांनी सतीश होले विद्यापीठ कर्मचारी म्हणून वेतन उचलत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच महापालिकेने देखील मानधन घेत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. होले हे तीनवेळा नगसेवक असून ते नियमित मानधन घेत असल्याचे महापालिका सचिव हरीश दुबे म्हणाले.
सतीश होले २००२ आणि २००७ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढले होते. २०१२ मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. त्यांनी २०१२ मध्ये भाजपत प्रवेश घेतला होता. परंतु पक्षाने त्यांना कोणतीही महत्त्वाची जबाबादारी दिली नव्हती. झोन सभापती किंवा किंवा एखाद्या समितीवर घेण्यात आले नव्हते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांना उपमहापौरपद देऊन खुश करण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु ते दोन ठिकाणीचे लाभार्थी असल्याने वादाचा भोवऱ्यात अडकले आहेत. होले हे विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत.

विद्यापीठ कर्मचाऱ्याला ‘कॉमन स्टँडर्ड कोड’प्रमाणे निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली आहे. ते विद्यीपाठाच्या आरोग्य केंद्रावर कंपाऊंडर आहेत. त्यांनी धारणाधिकार (लीन) घेतले नाही. त्यामुळे ते विद्यापीठाकडून वेतन घेत आहेत. उपमहापौर झाल्यानंतर कदाचित ते धारणाधिकार घेतील.
पूरण मेश्राम, कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

सतीश होले हे २००२ पासून नगरसेवक आहेत. इतर नगरसेवकांप्रमाणे ते मानधन उचलत आहेत. नगरसेवकांना ७ हजार ४०० रुपये मानधन दिले जाते.
हरीश दुबे, सचिव, नागपूर महानगरपालिका.