गोरवाडा प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेबांचे नाव देण्याच्या निर्णयावरून वाद सुरू असतानाच आता  उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यापुढे बांधण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहांना ‘मातोश्री’ हे नाव देण्यात येईल, अशी घोषणा शुक्रवारी नागपुरात केली. ‘मातोश्री’ हे नाव देण्याच्या संकल्पनेमागे आईची माया मिळावी हा हेतू असल्याने हे नाव देण्याचा निर्णय घेतल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

‘मंत्रालय आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत नागपूरला आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील खासगी निवासस्थानाचे नाव ‘मातोश्री’ आहे. त्यामुळे यापुढे वसतिगृहांना ‘मातोश्री’ नाव देण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वसतिगृहाचे उदय सामंत यांच्या हस्ते आज  उद्घाटन झाले. त्या वसतिगृहाला ‘मातोश्री’ नाव दिले होते. हे नाव देण्यामागची कल्पना तेथील कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी मांडली. ती सामंत यांना पटल्याने यापुढे राज्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या सर्व वसतिगृहांना ‘मातोश्री’ हे नाव देणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

संस्कृत विद्यापीठाची चार उपकेंद्र

संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रामटेक येथे कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मात्र, येथे प्रत्येक विद्यार्थ्यांना येऊन शिक्षण घेणे कठीण होत आहे. त्यामुळे संस्कृतचा अधिकाधिक प्रचार, प्रसार करण्याच्या उद्देशाने पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि रत्नागिरी अशा चार ठिकाणी संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र तयार करण्यात येणार असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.

पदभरती लवकरच

राज्य शासनाने पदभरती बंदीचा ४ मे रोजी लागू केलेला शासन निर्णय लवकरच रद्द होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. हा निर्णय रद्द होताच येत्या पंधरा दिवसांच्या आत विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये रखडलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या पदभरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.