नवीन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचा इशारा

नागपूर : गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील. प्रसंगी दंडुक्याचाही वापर केला जाईल, असा इशारा  नवीन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिला.

उपाध्याय यांनी आज पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली पुणे येथे झाली. उपाध्याय यांनी यापूर्वी नागपुरात वाहतूक पोलीस उपायुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त व कारागृहाचे उपमहानिरीक्षक या पदांवर काम केले आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत शहराचा कायापालट झाला असून गुन्हेगारीचे स्वरूपही बदलले आहे. आताच्या गुन्हेगारीचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात येतील. मात्र, पोलिसांचे मूळ काम कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारांवर अंकुश ठेवणे व लोकांपर्यंत पोहोचणे हे आहे. त्यामुळे पोलीस लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या मनातील वर्दीची असलेली भीती दूर करून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करेल . गुन्हेगारांसोबत सक्तीने वागण्यात येईल. रस्त्यांवरील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रस्त्यांवर पोलिसांची उपस्थिती वाढवली जाईल. जातीय हिंसाचार किंवा मॉब लिंचिंगसारख्या घटना नागपुरात होत नाही, पण अशा घटनांना टाळण्यासाठी लोकांसोबत संपर्क वाढवणे व जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात येईल. प्रथम गुन्हेगारी करणाऱ्यांना दुरुस्त करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येईल. शहरी नक्षलवादाचे आव्हान दिवसेंदिवस वाढत असून त्यासाठी विशेष सेल व गुप्तचर यंत्रणा अधिक चांगली केली जाईल, असेही डॉ. उपाध्याय यावेळी म्हणाले.

महसूल गोळा करणे वाहतूक पोलिसांचे काम नाही

वाहतूक पोलीस हे शहर पोलिसांचा चेहरा असतो. त्यांचा स्वभाव व शहरातील वाहतूक समस्या यावरून शहराचे मूल्यमापन केले जाते. शहरातील विकास व इतर कारणांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, नागरिकांशी कठोरपणे वागून समस्या सोडवता येऊ शकत नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येते. मात्र, पोलिसांचे महसूल गोळा करण्याचे काम नसून वाहतुकीला शिस्त लावणे ही प्रथम जबाबदारी आहे. लोकांसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या पोलिसांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येईल, असेही उपाध्याय म्हणाले.