गडकरी, पटोले, तुमाने, गजभिये यांचे अर्ज दाखल; नागपुरातून ४८ तर रामटेकमधून ३२ अर्ज

नागपूर : उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय उमेदवारांनी एकच गर्दी केली. युतीतर्फे नागपूरमधून नितीन गडकरी (भाजप) तर रामटेकमधून कृपाल तुमाने (सेना) यांनी तर आघाडीतर्फे नागपूरमधून काँग्रेसचे नाना पटोले आणि रामटेकमधून किशोर गजभिये यांनी अर्ज दाखल केले. यावेळी भाजप-सेना, काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

नागपूर लोकसभा मतदासंघातून एकूण ४८ अर्ज आले. रामटेकमधून ३२अर्ज दाखल झाले.  ११

एप्रिलला मतदान होणार आहे  गडकरी आणि पटोले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येताना शक्तिप्रदर्शन केले. गडकरी यांनी संविधान चौकातून तर पटोले यांनी बिशॉप कॉटन स्कूल मैदानातून मिरवणूक काढली.

गडकरी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते, तर पटोले यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, नितीन राऊत, आमदार सुनील केदार, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे होते.

अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांसह  बहुजन वंचित आघाडी, विदर्भ राज्य निर्माण महामंच, बहुजन मुक्ती पार्टी, गोंडवाना गणतंत्र पार्टी आदी उमेदवारांचा समावेश आहे. सकाळपासूनच आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. विविध पक्षांच्या झेंडय़ांनी आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

यांनी अर्ज दाखल केले (नागपूर लोकसभा) 

नितीन गडकरी (भाजप), साहील तुरकर (मानवधिकार पार्टी), गोपालकुमार कश्यप (छस्वामं),  डॉ. मनीषा बांगर (पिपाइं डेमोक्रॅटिक),  नाना पटोले (काँग्रेस), विठ्ठल गायकवाड (हम भारतीय पार्टी), विनोद बडोल (अखिल भारतीय सर्वधर्म समाज पार्टी), उदय  बोरकर (अपक्ष), दीक्षिता टेंभूर्णे ( देश जनहित पार्टी), सुनील कवाडे (अपक्ष), पल्लवी नंदेश्वर (पिपाइं डेमोक्रॅटिक), सचिन पाटील (अपक्ष), नीलेश ढोके (अपक्ष), श्रीधर सावळे (राष्ट्रीय जनसंभावना पार्टी), सिद्धार्थ कुर्वे (भारतीय दलित पँथर), सचिन सोमकुंवर  (अपक्ष) रविकांत मेश्राम, (बहुजन मुक्ती पार्टी), प्रफुल भांगे (अपक्ष), आनंद खोब्रागडे (अपक्ष), मन्सूर शेंडे (अपक्ष), सतीश निखार (अपक्ष), अली अहमद (बहुजन मुक्ती पार्टी), मनोहर डबरासे (वंचित बहुजन आघाडी),  योगेश जयस्वाल (विश्वशक्ती पार्टी), मोहम्मद जमाल शेख (बहुजन समाज पार्टी), हरेश निमजे (अपक्ष), असीम अली (मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी), अब्दुल पटेल (एआयएम), अ‍ॅड. उल्हास दुपारे (अपक्ष), दीपक मस्के (अपक्ष), मनोज बावने (अपक्ष), प्रभाकर सातपैसे (अपक्ष), अ‍ॅड.  विजया बागडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), रुबेन्ट फान्सिक (अपक्ष), कार्तिक डोके (अपक्ष), सुरेश माने (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ), वनिता राऊत (अखिल भारतीय मानवता पक्ष),  खुशबू मुकेश बेलेकर (बळीराजा पार्टी), योगेश  ठाकरे (सीपीआय (एमएल) रेडस्टार) यांचा समावेश आहे.

गडकरी यांचा नागपुरातून ऐतिहासिक विजय होईल. ते राज्यात विक्रम करतील. भाजप-शिवसेना लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकेल.’’

– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

२०१४ च्या निवडणुकीत २ लाख ८० हजार मतांनी विजयी झालो होतो. यावेळी मी मोठय़ा फरकाने विजयी होणार आहे. निवडणूक जाहीरनाम्यात  दिलेल्या आश्वासनांपेक्षा अधिक कामे केली आहेत.

– नितीन गडकरी, भाजप उमेदवार (नागपूर)

नागपूर आणि रामटेक हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आमचे नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले आहेत. शिवाय खुद्द गडकरी यांनी मला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे.

– नाना पटोले, काँग्रेस उमेदवार (नागपूर)

प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले असल्याने ग्रामीण भागातील समस्यांची माहिती आहे. पाणी पुरवठा, शेतकरी,  बेरोजगारी आणि कुपोषण हे प्रश्न आपण प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न करू.

– किशोर गजभिये, काँग्रेस उमेदवार (रामटेक)