नागपूर विद्यापीठाचे आश्वासन हवेत विरले :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१७ मध्ये १०४ व्या दीक्षांत सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी पदवीची डिजीटल कॉपी ‘नॅशनल अकॅडेमिक डिपॉजिटरी’वर (एनएडी) उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. तसा करारही झाला होता. मात्र, दोन वर्षांपासून एकही पदवी ऑनलाईन उपलब्ध झालेली नसल्याने विद्यापीठाच्या कारभारावर टीका होत आहे.

विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची कुठेही नोकरीसाठी निवड झाल्यास वेळेत कागदपत्रांची पडताळणी करता येत नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे विद्यापीठाने ‘नॅशनल अकॅडेमिक डिपॉजिटरी’ संस्थेशी २०१७ मध्ये सामंजस्य करार केला होता. याद्वारे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण ऑनलाईन पद्धतीने केले जाणार होते.

त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थी कुठेही नोकरीला लागला तरी संबंधित संस्थेला, कंपनीला ऑनलाईन पद्धतीने पदवीची तपासणी करता येणार होती. यासह देशविदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आवश्यकतेनुसार ऑनलाईन पदवी उपलब्ध झाली होती. मात्र, विद्यापीठाने घोषणा केल्यापासून या कालावधीत १०४, १०५ व १०६ अशा तीन दीक्षांत सोहळ्यात १ लाख ६६ विद्यार्थ्यांना पदव्या देण्यात आल्या. मात्र, यातील एकाही विद्यार्थ्यांची पदवी ऑनलाईन उपलब्ध नसल्याने देश-विदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अडचणी आहेत. १० ऑगस्ट २०१७ मध्ये झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत पदवी डिजीटल करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर ३० नोव्हेंबरच्या १०४ व्या दीक्षांत सोहळ्यात पहिल्यांदा पदवी देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर २४ मार्च आणि १९ जानेवारीच्या दीक्षांत सोहळ्यातही विद्यापीठाने पदव्यांचे डिजीटल वितरण केले नाही.

अशी राहणार प्रक्रिया

नागपूर विद्यपीठातर्फेकरण्यात आलेल्या करारामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना थेट फायदा होईल. पोर्टलवर ‘सॉफ्टकॉपी’ नेहमीसाठी ‘सेव्ह’ राहील. तसेच विद्यार्थ्यांसाठी हे पोर्टल उपयुक्त ठरले. त्यांना युजरनेम आणि पासवर्ड देण्यात येईल, त्याद्वारे पोर्टलवर लॉग इन करता येईल. विद्यापीठ आणि एनएसडीएल यांच्यात २०१९ पर्यंत हा करार झाला होता. विद्यापीठातर्फे टप्प्याटप्प्याने १० वर्षांतील पदव्या अपलोड करण्यात येणार होत्या. मात्र, करार संपत आला असतानाही विद्यापीठाची गाडी कुठे अडली हे सांगायला कुणीच तयार नाही.

ऑनलाईन पदवी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया कुठे थांबली आहे, याची चौकशी करून डिसेंबरमध्ये होणाऱ्या १०७ व्या दीक्षांत सोहळ्यात तरी सर्व पदव्या ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.’’

– डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग