मेडिकल, मेयो, डागातून मटण व अंडी  गायब

महेश बोकडे, नागपूर</strong>

उपराजधानीतील मेडिकल, मेयो, डागा या शासकीय रुग्णालयांतील रुग्णांच्या थाळीतून मांसाहार  गायब झाला आहे, तर डागा आणि प्रादेशिक मनोरुग्णालयात तीन वर्षांपासून मटण बंदी आहे. केवळ आठवडय़ात एक दिवस अंडी  दिली जात असल्याची माहिती आहे. या आहाराऐवजी इतर प्रथिनेयुक्त आहार रुग्णांना दिले जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

मांसाहार सवर्गातील मटण आणि अंडी यात प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढते, असा डॉक्टरांचा दावा आहे. शासनाकडूनही प्रत्येक रुग्णालयांतील रुग्णांना पौष्टिक व सकस आहार देण्याचे निर्देश आहेत, परंतु उपराजधानीतील शासकीय रुग्णालयांत हळूहळू मांसाहाराला कात्री लावली जात असल्याचे चित्र आहे. आहार तज्ज्ञानुसार दर दिवसाला एका व्यक्तीला किमान २००० ते २,४०० कॅलरीजची गरज आहे. रुग्णाला पौष्टिक आहारातून एवढय़ा कॅलरीज मिळायला हव्या. मेडिकल, मेयो, डागातील रुग्णांच्या आहारात १९८५ सालापर्यंत मटण तर २००९ पर्यंत अंडी प्रत्येक आठवडय़ात मागणीनुसार एक ते दोन वेळा दिले जात होते, परंतु आता ते हद्दपार झाले आहे, परंतु मेयोत क्षयरुग्णांना अंडी दिली जाते, असा प्रशासनाचा दावा आहे. पूर्वी  मेडिकलमध्ये रुग्णांना दसरा आणि दिवाळीला गोड पदार्थही दिले जात होते. मेडिकलच्या रुग्णांना मिळणारा फलाहारही बंद होत आहे. मेडिकलच्या पाकखान्याचा वार्षिक खर्च हा ७० ते ७२ लाख, तर मेयोचा सुमारे ५० लाखाहून कमी असल्याची माहिती आहे.

कर्मचाऱ्यांचा तुटवडा

मेडिकलच्या स्वयंपाकघरात वीस वर्षांपूवी कर्मचाऱ्यांची  ५२ पदे मंजूर होती. कालांतराने येथे खाटा वाढण्यासह सेवेवरील कर्मचारी निवृत्त झाले, पण  पदभरती झाली नाही. आजघडीला येथील कर्मचाऱ्यांची संख्या दहा आहे. या कर्मचारी कमी असल्याचा परिणाम आहार पुरवठय़ावर होत आहे. मेडिकलमधून मेडिकल, सुपर स्पेशालिटी, टीबी रुग्णालयात आहाराचा पुरवठा होतो. येथे रोज दोन वेळेच्या जेवणासाठी दर दिवसाला साडेतीन हजार पोळ्यांची गरज भासते. कर्मचारी कमी असल्याने गरजेइतका पुरवठा होत नाही. पोळ्या कमी असल्यास पाव दिला जातो. कधी खिचडी, भात इतर वस्तंचे वाटप केले जाते.

‘‘शासनाने प्रथिनांची अधिक गरज असलेल्या रुग्णांना मांसाहार व शाकाहार असा पर्याय आहारात द्यायला हवा. परस्पर रुग्णांच्या आहारातून अंडी व इतर मांसाहाराचे पदार्थ बंद करेण अयोग्य आहे. याबाबत शासनाला निवेदनही दिले आहे.’’

– त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कर्मचारी संघटना, नागपूर.

दिवसाला २३.८ रुपयांचा खर्च

मेडिकल, मेयोत एका बीपीएल रुग्णाला दुपारच्या जेवणाला ११ रुपये ५४ पैसे आणि सायंकाळच्या जेवणाला ११ रुपये ५४ पैसे, अशाप्रकारे दिवसाला दोन वेळच्या जेवणासाठी २३ रुपये ८ पैसे खर्च येतो. महागाईमुळे त्यात थोडी वाढही झाल्याचे प्रशासन सांगते. हे जेवण बीपीएल रुग्णांना मोफत असते, तर एपीएल रुग्णांना मात्र जेवणासाठी सुमारे २० रुपये द्यावे लागते.