सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्टय़ा मागास असणाऱ्यांना आरक्षण दिले पाहिजे. परंतु, आरक्षणाने समाजाची प्रगती होते हे खरे नाही. आजवर ज्या समाजाने जास्तीत जास्त आरक्षणाचा लाभ घेतला, त्या समाजाची प्रगती झाली नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केले.

अखिल भारतीय माळी समाजाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, मी जात मानत नाही. मनुष्य जातीने नव्हे, तर गुणाने मोठा होतो असे मी मानतो. पक्षाची उमेदवारी मागताना जेव्हा कर्तृत्वात उमेदवार कमी पडतो, तेव्हा जातीचे कार्ड पुढे केले जाते. जॉर्ज फर्नाडिस यांची कोणती जात होती, इंदिरा गांधी जात घेऊन आल्या नव्हत्या. गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री झाले ते जातीमुळे नव्हे. मी पक्षाचा अध्यक्ष असताना लोक म्हणायचे, महिलांना आरक्षण मिळायला हवे. मी लगेच त्यांना विचारत असे, इंदिरा गांधी यांना कोणते आरक्षण मिळाले? कित्येक वर्षे इंदिराजींनी राज्य केले, लोकप्रिय झाल्या. महिला म्हणून त्या पंतप्रधान झाल्या नव्हत्या. वसुंधरा राजे, सुषमा स्वराज यांना कुठे आरक्षण मिळाले? तेव्हा आरक्षण मिळायला हवे, पण ते समाजातील शोषित, पीडित, दलित, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्टय़ा मागास असलेल्यांना. आरक्षणाने समाजाची प्रगती होईल, असे कोणाला वाटत असेल तर तर ते खरे नाही, असे ते म्हणाले.

घराणेशाहीवर टीका

* निवडणुकीत नेते पहिली उमेदवारी पत्नी, दुसरी मुलाला आणि तिसरी ड्रायव्हरसाठी मागतात. मी मुलासाठी उमेदवारी मागत नाही, असे गडकरी म्हणाले.

* लोकांनी म्हटले पाहिजे, तुमच्या मुलाला उमेदवारी द्या. पण, नेते नातलगांसाठी उमेदवारी मागतात.

* त्यांची मुलेही खादीचे कपडे घालून नेतेगिरी करतात. हे चालणार नाही. जनतेचे जे काम करतील, तेच लोक टिकतील, असे परखड मत गडकरी यांनी व्यक्त केले.

‘मोदींनी कधी जात सांगितली नाही’

पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा करताना गडकरी म्हणाले, चांगले काम केले तर लोकांना मत मागायला जावे लागत नाही, लोक स्वत: मत देतात. मोदी कधी जात सांगत नाहीत. परंतु, काही लोक मोठय़ा पदावर गेल्यावर जात सांगत असतात, असे गडकरी म्हणाले.