नागपूर : देना बँकेत उघडकीस आलेल्या १०० कोटींच्या घोटाळ्यात पोलिसांनी १७ जणांना नोटीस बजावली असून त्यात चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) आणि बँक व्यवस्थापकाचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाची खोली अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

गुन्हे शाखा पोलिसांनी दोन प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. एका गुन्ह्य़ात सतीश बाबाराव वाघ,  प्रभाकर दौलतराव आमदरे, अशोक रामभाऊ शिंदेकर, ललित रामचंद्र देशमुख, कुसुम मधुकर मानकर, भारत बाबुराव राजे, जयंत नाराजी देशमुख, जगदीश झनकलाल चौधरी, स्वप्निल भीमराव कौरोती, गणेश बाबुराव राजे आणि भोजराज दिनबाजी उकीनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी संगनमताने दवलामेटी येथील खसरा क्रमांक २७ हा भूखंड खरेदी करण्यासाठी २०१५ मध्ये देना बँकेकडून २ कोटी ४ लाखांचे कर्ज घेतले, परंतु बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बांधकामाची पाहणी केली असता त्या ठिकाणी काहीच नव्हते.

त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यापैकी केवळ अशोक शिंदेकर याला पोलिसांनी अटक केली असून त्याला २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रकरणात  माँ अनसूया ट्रेडिंग कंपनीचा मालक दिलीप मोरेश्वर कलेले, अनिता अरुण नागभिडकर, समीर भास्कर चट्टे, मेसर्स आदिनाथ इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड ट्रेडिंग कंपनीचा संचालक मेहुल रजनिकांत धुवाविया आणि समीरची कंपनी तुळजा भवानी ट्रेडिंग कॉपरेरेशनवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

समीर याने स्वत:चा मामा दिलीप कलेले याच्या माँ अनसूया ट्रेडिंग कंपनीच्या नावाने देना बँकेच्या धरमपेठ शाखेतून प्लास्टिक खुर्ची, टेबल व इतर वस्तू तयार करण्यासाठी दोन कोटी रुपयांची कॅश क्रेडिट घेतली व बँकेची फसवणूक केली.

तिसरे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे असून त्याची चौकशी सुरू आहे. या आरोपींसह तत्कालीन बँक व्यवस्थापक व सीएला नोटीस बजावली असून चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

सर्व प्रकरणात एकच सीए

याशिवाय बँकेकडे १७ इतर फसवणुकीची प्रकरणे समोर आली असून त्यांचा तपास बँक करीत आहे. त्या सर्व प्रकरणांमध्ये एकच सीए कंपनी आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये दुसऱ्या सीएचे बनावट अंकेक्षण अहवाल आहेत. त्यामुळे सीएच्या संगनमताने बँकेची फसवणूक झाली असावी, असा संशय बळावत असून त्यासंदर्भात बँकेचे विभागीय व्यवस्थापक अरविंद कुंभार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.