करोना काळात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना १० हजार रुपये प्रोत्साहन भत्ता तर ‘इंटर्नशिप’ करणाऱ्या डॉक्टरांनाही अतिरिक्त भत्ता देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र डॉक्टरांप्रमाणेच २४ तास सेवा देणाऱ्या परिचारिका, मदतनीस, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या संघटनेत संताप व्यक्त होत आहे. डॉक्टरांप्रमाने भत्ता देण्याची मागणी या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

राज्यात मार्च महिन्यात करोनाचे संकट आल्यावर अवघ्या दोन-तीन महिन्यानंतर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय महाआघाडी सरकारने घेतला. यामुळे निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन साठ ते सत्तर हजारांवर गेले. त्यानंतर अलीकडेच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना कोविड काळातील सेवेसाठी अतिरिक्त भत्ता देण्यात येईल, अशी घोषणा शासनाने केली. सध्या ही वाढ पुण्या-मुंबईतील डॉक्टरांना लागू झाली आहे. तेथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना ३० हजार रुपये विद्यावेतन मिळत आहे. परंतु थेट कोविड वार्डात दिवसरात्र सेवा दिल्यावरही परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना असा भत्ता मिळत नाही. याबाबत महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस फेडरेशनच्या तनुजा घोरमारे आणि विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे (इंटक) अध्यक्ष त्रिशरण सहारे यांनी नाराजी व्यक्त करीत तातडीने यांनाही भत्ता देण्याची मागणी केली आहे.

करोना काळात पहिल्या दिवसापासून परिचारिका पूर्ण क्षमतेने अपुरी साधन-सामुग्री असतानाही सेवा देत आहेत. ही सेवा देताना नागपुरातील साडेतीनशेवर परिचारिका करोनाने बाधित झाल्या. मात्र बरे झाल्यानंतर पुन्हा सेवेत दाखल झाल्या. त्यामुळे परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन भत्ता देण्याची गरज आहे.

– तनुजा घोरमारे (वाटकर) कार्याध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्न्मेंट विदर्भ नर्सेस फेडरेशन.