महाराष्ट्रातील भौगोलिक स्थिती आणि हवामान चतुर (ड्रॅगनफ्लाय) व टाचण्या (डॅमसेलफ्लाय) या कीटकांसाठी पोषक असतानाही, गेल्या काही वर्षांत वाढलेले प्रदूषण, औद्योगिकरण आणि भौतिक प्रगतीमुळे त्यांचे अस्तित्व संकटात आले आहे. जल आणि वायू प्रदूषणाचाही त्यांच्या अस्तित्वावर विपरित परिणाम झाला असून त्यांच्या अधिवासात आमुलाग्र बदल घडून येत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘ओडोनाटा’चे अभ्यासक डॉ. आशिष टिपले यांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

महाराष्ट्राच्या कुशीतील अनमोल जैवविविधतेच्या खजिन्यातील महत्त्वपूर्ण, पण काहीसा दुर्लक्षित असा घटक म्हणजे कीटक आहे. कीटक प्रजातीतील ओडोनाटा मानवी वस्तीला आणि कृषीसंस्थेला पुरक आहे आणि अन्नसाखळीत वाघाइतकाच तोही महत्त्वाचा आहे. ‘ओडोनाटा’ या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या चतुर आणि टाचण्या सुमारे ३५ कोटी वषार्ंपासून पृथ्वीतलावर अस्तित्वात असून आकारमान सोडल्यास त्यांच्यात किंचितही बदल झालेला नाही. मजबूत पंख आणि स्नायूंच्या मदतीने हे कीटक ३० ते ६० किलोमीटर प्रती तास वेगाने उडू शकतात. या कीटकाबाबतची सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे, हे चतुर भारत, आफ्रिका, असा अविश्वसनीय १७ हजार किलोमीटरचा प्रवास दरवर्षी महासागरावरुन उडून करतात. हवेत अतिशय वेगवान हालचाली करणाऱ्या चतूर आणि टाचण्यांचे मुख्य खाद्य सूक्ष्म कीटक आणि डास असल्याने ही कीटक प्रजाती मानवी वसाहतीसाठी आणि कृषी संस्थेसाठी महत्त्वाची आहे. याच वैशिष्टय़ांमुळे डासांच्या नियंत्रणासाठी याचा वापर काही देशात केला जातो. त्यामुळे ‘बायोकंट्रोल एजंट’ म्हणूनही याची ओळख निर्माण झाली आहे. विदर्भातील पेंच, बोर, ताडोबा आदी व्याघ्र प्रकल्प केवळ वाघांसाठी नव्हे, तर चतूर आणि टाचण्यांसाठीसुद्धा महत्त्वाचा अधिवास आहे. १३४ पैकी ८४ प्रजाती विदर्भात आहेत. मात्र, प्रदूषणामुळे काही प्रजाती आता जंगलापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

डॉ. टिपले यांनी २००६ ते २०१६ या काळात केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

प्रजनन काळ हिवाळ्यापासून

‘ओडोनाटा’चा प्रजनन काळ हिवाळ्याच्या सुरुवातीपासून सुरू होतो, पण बऱ्याच जाती वर्षभर प्रजनन करतात. चतुर व टाचण्या पाण्यावर उडत पाण्यात अंडी टाकतात. या अंडय़ातून त्यांची पिले बाहेर आली की, पाण्यातच इतर कीटक, अळ्या, डास आणि छोटे मासे खाऊन ते मोठे होतात. ही पिले डासांच्या अळ्यादेखील खातात. पूर्णपणे विकसित झाल्यानंतर एखाद्या पाणवनस्पतीच्या देठाला धरून पाण्याबाहेरील जगात प्रवेश करतात.

अधिवासाचे जतन आवश्यक -डॉ. आशिष टिपले

चतुर आणि टाचण्या हे कीटक संवेदनशील असतात. अधिवासात झालेल्या बदलांचा त्यांच्या संख्येवर परिणाम होतो. त्यामुळेच कीटकांना अधिवासाच्या स्थितीचे दर्शक म्हणून ओळखले जाते. या प्रजातींचे संवर्धन करायचे असेल, तर प्रदूषणाला आळा घालणे, औद्योगिकरणाला लगाम घालणे आदी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या अधिवासाचे जतन करणे आवश्यक आहे, असे मत संशोधनाअंती वर्धा येथील विद्याभारती महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. आशिष टिपले यांनी व्यक्त केले आहे.