‘नासुप्र’चे मैदान बळकाविण्याचा प्रयत्न

घराशेजारी असलेल्या मैदानावर कुणीच खेळू नये किंवा त्याचा वापरही करू नये म्हणून एका डॉक्टरने मैदाना भोवताली सूचना लावली. नागरिकांनी या सूचनांना भीक न घातल्याने शनिवारी संक्रांतीनिमित्त पतंग उडविणाऱ्या लोकांवर या डॉक्टरने पक्षी मारणाच्या बंदुकीतून गोळीबार केला. यात एकाच्या मानेवर गोळी लागल्याने तो जखमी झाला. ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देशपांडे लेआऊट परिसरात घडली.

गुरुप्रित संधू (२३,रा.त्रिमूर्तीनगर) असे जखमीचे नाव आहे. गुरुप्रित संक्रांतीनिमित्त मित्रांसह शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास देशपांडे लेआऊटमधील

मैदानावर पतंग उडवत होता. दरम्यान, शेजारी डॉ. धीरज भोजवानी याने घराच्या छतावरून या पतंग उडविणाऱ्यांवर बंदुकीतून तीन वेळा गोळी झाडली. त्यापैकी एक गोळी गुरुप्रितच्या मानेजवळ लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर सर्व जण नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणी स्थानिक व्यक्ती नंदकिशोर शर्मा आणि इतर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी गोळा झाले. त्यावेळी त्यांनी लोकसत्ताला सांगितले की, त्या परिसरात आरोपीच्या वडिलांचे अर्जुन भोजवानी नावाचे रुग्णालय आहे. त्याच्याशेजारीच त्यांचा बंगला आहे. बंगल्याला लागून नागपूर सुधार प्रन्यासचे मैदान असून तेथे परिसरातील मुले खेळतात. या मैदानावर लोकांनी खेळू नये, म्हणून भोजवानी कुटुंबीय धमकावतात, परंतु शनिवारी संक्रांतीनिमित्त मुले पतंग उडवित असताना डॉ. धीरजने घराच्या छतावरून गोळीबार केला. त्यानंतर प्रकरण पोलिसात पोहोचले.

गुन्हा दाखल न होण्यासाठी पोलिसांकडूनच प्रयत्न

या प्रकरणात जखमीसह त्याचे मित्र पोलीस ठाण्यात पोहोचले. सर्व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉ. धीरजला पोलीस ठाण्यात आणले. मात्र, एकाला गोळी लागून रक्त निघाल्यानंतरही गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलीस तक्रारदारावर दबाव टाकत होते. शेवटी, या प्रकरणात गुन्हा दाखल झालाच नाही. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन्ही पक्षात सामंजस्य झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे सांगितले.

गोळीबार प्रकरणात सामंजस्य कसे?

शहरात दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी गांधीबागेत आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यानंतर अजनी पोलीस ठाण्यांतर्गत गोळीबाराची घटना समोर आली. डब्बा व्यापारी रवी अग्रवाल यानेही हवेत गोळीबार केल्याच्या चलचित्रानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आता पुन्हा पक्षी मारण्याच्या बंदुकीतून एकावर जीवघेणा हल्ला झालेला असूनही पोलीस मध्यस्थी करून अशा गंभीर गुन्ह्य़ात सामंजस्य कसे घडवून आणतात, हे न उमगणारे कोडे आहे. पोलीस आयुक्तांनी अशा प्रकरणांमध्ये स्वत: लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.