महेश बोकडे

करोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत प्राणवायूचा वापर वाढला आहे.  प्राणवायू सध्या बाहेरून खरेदी करावा लागत आहे. त्यातच तज्ज्ञांकडून आतापासूनच तिसऱ्या लाटेचाही अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे भविष्यात कुठेही प्राणवायूचा तुटवडा पडू नये म्हणून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत हवेतून प्राणवायू तयार करणारे प्रकल्प उभारले जातील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात करोनाचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यांनी लोकसत्ताशी संवाद साधला. राज्याच्या विविध भागात २० शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये आहेत. यापैकी बहुतांश रुग्णालयांत  गंभीर करोनाग्रस्त वाढल्याने त्यांच्यावर उपचाराचा भार वाढला आहे. नागपूरसह विदर्भात रुग्णसंख्या जास्त असल्याने येथे पूर्वीच्या तुलनेत खूप जास्त प्राणवायू लागत आहे.  दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आतापासूनच पुढे तिसऱ्या लाटेचाही अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे पुढे टर्शरी दर्जाच्या एकही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत प्राणवायूचा तुटवडा जाणवू नये म्हणून सर्वत्र हवेतून प्राणवायू तयार करणारे प्रकल्प उभारले जातील. त्यामुळे या रुग्णालयांचे प्राणवायूच्या बाबतीत इतरांवरील परावलंबित्व कमी होईल.  या प्रकल्पांसाठी राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील अधिष्ठात्यांना त्यांना किती प्राणवायू लागतो, त्यानुसार तेथे हवेतून प्राणवायू तयार करणारे प्रकल्प कशा पद्धतीने फायद्याचे ठरू शकतात वा त्याबाबत त्यांचे मत काय, हे जाणून घेतले जाणार आहे. ते जाणून घेतल्यावर या प्रकल्पावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे, असेही अमित देशमुख यांनी सांगितले.

कंत्राटी शिक्षकांना लवकरच गोड बातमी

राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील कंत्राटी शिक्षक करोना योद्धे म्हणून पूर्ण क्षमतेने सेवा देत आहेत. या कठीण काळासह गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी शिक्षक म्हणून सेवा देणाऱ्या शिक्षकांना कायम करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. त्याबाबत प्रयत्न सुरू असतानाच सामान्य प्रशासन विभागाने काही आक्षेप घेतले आहेत. त्यानंतरही शासन तातडीने ही समस्या सोडवून त्यांना कायम करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. त्यामुळे लवकरच या सर्व शिक्षकांना गोड बातमी मिळू शकते, असे संकेतही  देशमुख यांनी दिले.

कंत्राटी डॉक्टरांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत रुग्णांच्या तुलनेत डॉक्टर कमी पडत आहेत. दुसरीकडे काही कारणामुळे कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांची नियुक्ती संबंधित महाविद्यालयांना करता येत नव्हती. परंतु हा प्रश्न आता सोडवण्यात आला असून नागपूरच्या मेडिकलसह राज्यातील सर्व महाविद्यालयांत तातडीने कंत्राटी पद्धतीने विभागीय निवड मंडळाकडून नियुक्ती केली जाईल, असेही अमित देशमुख यांनी सांगितले.