खिडकीसमोर रांगेत राहून तिकीट खरेदी करण्याचा त्रास ई-तिकीट सुविधेमुळे कमी झाला असून इंटरनेटवरून तिकीट घेण्यास पसंती वाढत आहे, परंतु असे तिकीट खरेदी करणे किंवा रद्द करण्यासाठी रेल्वेकडून प्रवाशांना नाहक भरुदड मात्र सहन करावा लागत आहे. ई-तिकीट आणि खिडकीवर उपलब्ध तिकीट खरेदी करणे आणि रद्द करण्याचा नियमात सुसूत्रता नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.
ई-तिकीट असणाऱ्या प्रवाशांकडे ‘कन्फर्म’ तिकीट नसले तरी प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, त्या प्रवाशांना सामावून घेण्याची सोय रेल्वे करताना दिसत नसल्याने ‘आरएसी’ किंवा ‘वेटिंग’ तिकीट असलेल्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. रेल्वेच्या नियमानुसार एका ई-तिकिटावर ४ प्रवासी प्रवास करू शकतात. ४ पैकी एकाचेही ‘बर्थ कन्फर्म’ किंवा ‘आरएसी’ असल्यास चारही प्रवाशांना प्रवास करता येतो, पण उर्वरित तीन प्रवासी कुठे बसतील, हा प्रश्न अनुत्तरित ठेवण्यात आला आहे. आरक्षित तिकिटांसाठी ई-तिकीट घेणे सोयीचे आहे, त्यामुळे साहजिकच लांब पल्ल्याचा प्रवास करणारे ई तिकीट घेतात. हे माहिती असूनही ई-तिकिटांचे सुसूत्रीकरण करण्यात आलेले नाही, यामुळे रेल्वे प्रवासी आणि तिकीट तपासणीस यांच्यात वारंवार उडणारे खटके आणि वादावादी हे नित्याचेच झाले आहे.
ई-तिकीट खरेदी आणि रद्द करण्याचे नियमही जणू प्रवाशांना लुटण्यासाठी बनवण्यात आले आहे का?, अशी शंका येते. एसी फर्स्ट क्लासचे कन्फर्म तिकीट ४८ तासांआधी रद्द केल्यास प्रत्येक प्रवाशामागे २४० रुपये शुल्क आकारण्यात येते. एसी टू टिअरचे कन्फर्म तिकीट रद्द केल्यास २०० रुपये कापण्यात येतात.
एससी टिअरचे रद्द केल्यास १८० आणि स्लिपर क्लासचे तिकीट रद्द केल्यास १२० रुपये परस्पर कापण्यात येतात. नियोजित गाडी निघण्याच्या चार तासापूर्वी कन्फर्म तिकीट रद्द केल्यास ५० टक्के रक्कम कापण्यात येते. कन्फर्म तिकीट गाडी सुटण्याच्या चार तासापूर्वी रद्द करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज टाकण्यात न आल्यास एक दमडीही रेल्वे परत करत नाही. ‘आरएसी’ तिकिटासाठीही हाच नियम आहेत. एकीकडे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्रवास करता येत नाही, असा नियम आहे, तर दुसरीकडे ई-तिकीट काढणाऱ्यांकडे एक बर्थ जरी आरएसी असेल, तर इतर प्रवाशांना प्रवास करता येतो, असा दुसरा नियम आहे. आरएसी किंवा प्रतीक्षा यादीतील ई-तिकीट रद्द करताना ६० रुपये लिपिक शुल्क आकारण्यात येते. याचाच अर्थ, ई-तिकीट काढले आणि प्रवास केला नाही तरी रेल्वे रक्कम कापूनच घेते.

एक महिन्यांनी परतावा
खिडकीवरून विकल्या जाणाऱ्या तिकिटांप्रमाणे ई-तिकीटही ‘कन्फर्म’ न झाल्यास आपोआप रद्द करण्याची सुविधा होणे आवश्यक आहे. तसेच तिकीट रद्द झाल्याबरोबर परतावा मिळायला हवा. सध्या तिकीट रद्द करण्याची विनंती करावी आणि एक महिन्यानंतर परतावा केला जातो, असे रेल्वेयात्री केंद्राचे वसंत शुक्ला यांनी सांगितले.

ई-तिकिटामुळे अतिरिक्त भरुदड
रेल्वे ही सेवा आयआरसीटीसीच्या माध्यमातून देत आहे. रात्री १२.२० ते रात्री ११.४५ वाजेपर्यंत तिकीट खरेदी किंवा रद्द करता येते. आय-तिकीट सेवेसाठी आयआरसीटीसी स्लीपर क्लासकरिता ८० रुपये अधिक सेवाकर आकारते. उच्च श्रेणीतील तिकिटांसाठी १२० रुपये अधिक सेवाकर, ई-तिकीट सेवेकरिता स्लीपर क्लासमधील तिकिटांवर २० रुपये अधिक सेवाकर आणि उच्च श्रेणीतील तिकिटांवर ४० रुपये अधिक सेवाकर प्रवाशांकडून घेण्यात येतो.