22 September 2019

News Flash

पंतप्रधान येती घरा.. यंत्रणा लागली कामाला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी  शनिवारी सायंकाळी ५ वाजता नागपूरला येणार आहेत

(संग्रहित छायाचित्र)

महापालिका अधिकाऱ्यांची बैठक; मेट्रो सुरक्षा आयुक्तांची दुसऱ्या दिवशीही पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी होणाऱ्या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी महापालिका, पोलीस आणि महामेट्रोसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामाचे वाटप केले आहे.

नियोजित दौऱ्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी  शनिवारी सायंकाळी ५ वाजता नागपूरला येणार आहेत.अडीच तासाच्या त्यांच्या दौऱ्यात ते मेट्रोच्या बर्डी ते लोकमान्य नगर प्रवासी सेवेचे उद्घाटन व क्रीडा संकुलात आयोजित विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर सभेला संबोधितही करणार आहेत. दोन दिवसावर आलेल्या दौऱ्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

महापौर नंदा जिचकार व आयुक्त अभिजित बांगर यांनी आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वसंबंधितांना सूचना दिल्या. पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे, तेथील रस्त्याची दुरुस्ती, खड्डे भरणे, स्वच्छता आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. वाहन ताफ्यांच्या मध्ये मोकाट जनावरे आडवी येऊ नये म्हणून कोंडवाडा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. मार्गातील सर्व सिग्नल्सची दुरुस्ती व तपासणी करावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या. पंतप्रधानांच्या दौरा मार्गावर  विमानतळ, राजभवन, मानकापूर स्टेडियम, सुभाषनगर, मुंजे चौक याठिकाणी प्रत्येकी एक अग्निशमक गाडी तैनात केली जाणार आहे.

दरम्यान, महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमाबाबत सूचना दिल्या. या बैठकीला महापौर नंदा जिचकार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक उपस्थित होते.

बर्डी ते लोकमान्य नगर २० रुपयात

शनिवारपासून सुरू होणाऱ्या लोकमान्य नगर ते बर्डी  मेट्रोप्रवासाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासाठी प्रवाशांना केवळ २० रुपये मोजावे लागतील. तसेच सीताबर्डी इंटरचेंज ते सुभाष नगर पर्यंतच्या प्रवासासाठी १० रुपये आणि सुभाष नगर ते लोकमान्य नगरपर्यंत १० रुपये द्यावे लागतील.

ना-हरकत प्रमाणपत्र आज

प्रवासी सेवेसाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र मेट्रो सुरक्षा आयुक्तांकडून बुधवारी मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून मेट्रोचे मुख्य सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग व त्यांची चमू नागपूर दौऱ्यावर आहे. दोन दिवस त्यांनी मेट्रोच्या तांत्रिक आणि प्रवाशांच्या सुरक्षाविषयक उपकरणांची पाहणी व तपासणी केली. त्यांच्याकडून बुधवारी प्रवासी सेवेबाबत ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त होण्याची शक्यता मेट्रोच्या सूत्रांनी व्यक्त केली. या प्रमाणपत्रानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुभाषनगर ते बर्डी या मेट्रो प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

.. तर पंतप्रधानांच्या दौऱ्यात असहकार्य

एसएनडीएल कर्मचाऱ्यांचा इशारा

वेतन थकल्याने ‘एसएनडीएल’चे अधिकारी, कर्मचारी तसेच देयके थकल्याने कंत्राटदारांनी बुधवारी अचानक एस. के. टॉवर मुख्यालयात दोन तास कामबंद आंदोलन केले. प्रश्न न सुटल्यास पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यात सेवा न देण्याचा इशारा दिला.

एसएनडीएमधील अधिकारी व काही कर्मचाऱ्यांची वेतनातून कपात केलेली २० टक्के रक्कम एक वर्षांनंतर जूनमध्ये परत केली जाते. मात्र अडीच वर्षांपासून ही रक्कम कंपनीने दिली नाही. दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे गेल्या महिन्याचे वेतनही थकले आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे सुमारे १८ कोटी रुपये कंपनीकडे थकित आहेत. या रकमेसाठी अधिकारी व  मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी दोन तास कामबंद केले.  देखभाल व दुरुस्तीचे काम करणाऱ्या सहा कंत्राटदारांनीही त्यांच्या थकित देयकासाठी व्यवसाय प्रमुखांना घेराव घातला. व्यवस्थापनाने  दखल न घेतल्याने आंदोलकांनी रात्री  मुख्यालयाला कुलूप ठोकले. तसेच बेमुदत कामबंद करणार असल्याचे फलक लावले.

First Published on September 5, 2019 7:48 am

Web Title: pm narendra modi nagpur visit abn 97