आबालवृद्धांच्या मनात काव्य प्रतिभेतून स्थान मिळविणारे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची काव्यसृष्टी उलगडून दाखवताना आनंदयात्री या कार्यक्रमातून रसिकांना शब्दांचा आणि सुरांचा आनंद घेता आला.

विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक समितीच्यावतीने कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या काव्यांवर आधारित भावपूर्ण असा आनंदयात्री हा शब्द आणि स्वरांची सुरेल साज असलेला कार्यक्रम साहित्य संघाच्या सभागृहात सादर करण्यात आला. आयुष्यभर कवितेमध्ये जगलेले आणि रमलेले मंगेश पाडगावकर यांच्या लेखनीतून साकारलेली अनेक गीते आजही रसिकांच्या हृदयात आणि मनामनात घर करून बसली आहे. त्यातील काही निवडक लोकप्रिय झालेली गीते आनंदयात्री या कार्यक्रमातून सादर करण्यात आली. पाडगावकरांच्या आयुष्यातील अनेक आठवणींना आणि त्यांच्या साहित्याला उजाळा देत ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक अरुणा ढेरे यांनी या कार्यक्रमाचे संहितालेखन केले.

विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांच्या शब्दालंकारांनी सजलेला तो काळ म्हणजे, काव्य रसिकांसाठी एक आनंदयात्रा होती. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना स्फुरलेली पहिली कविता ते अमेरिकेत लावलेल्या काव्यवाचनाचा धडाका आणि त्यावर विंदांनी लिहिलेल्या पत्रातून त्यांचा घेतलेला विनोदी समाचार व त्याच पत्रात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश यांना मराठी कवितेत लुडबूड करण्याची झालेली हौस आणि त्याचा अखेर असा संपूर्ण प्रवास म्हणजे आनंदयात्री होय. यावेळी कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं तरी छापलं, ओठावर आल्याखेरीज नसते ते आपलं, पाणी ओठ लावल्याशिवाय पाणी नसतं आपलं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’ या त्यांच्या कवितांच्या सादरीकरणासह काही गीते सादर करण्यात आली.

मंजिरी वैद्य यांनी सादर केलेल्या माझे जीवन गाणे या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सारंग जोशी यांनी जेव्हा तिची नी माझी.. गीत सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. शुक्रतारा मंद वारा, दिवस तुझे हे फुलायचे, श्रावणात घन निळा, भातुकलीच्या खेळामधली, शब्दावाचून कळले सारे, सांग सांग भोलानाथ इत्यादी गीते यावेळी सादर करण्यात आली.

या जन्मावर या जगण्यावर या अरुण दाते यांनी गायलेले हे गीत यावेळी सारंग जोशी यांनी सादर केले. या कार्यक्रमाद्वारे पाडगावकरी प्रहसन आणि त्यांच्या गोतावळ्यातील दिलखुलास स्मृतींना उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमात मोरेश्वर दहासहस्त्र यांनी तबलासंगत, परिमल जोशी यांनी सिंथेसायझर आणि विक्रम जोशी यांनी ऑक्टोपॅडवर कार्यक्रमाला साजेशी अशी साथसंगत केली. कार्यक्रमाचे रसाळ आणि अभ्यासपूर्ण निवेदन रेणुका देशकर आणि डॉ. आशुतोष जावडेकर यांनी केले. प्रारंभी डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते सर्व गायक, वादक, कलावंतांचा सत्कार करण्यात आला.  सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर उपस्थित होते.