सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. व्यंकटेश यांचा पुढाकार; मध्य भारतातील पहिले केंद्र ठरणार
विदर्भासह मध्य भारतात सर्प, विंचू यासह विविध प्राण्यांच्या दंशामुळे विषबाधा झालेले रुग्ण मोठय़ा प्रमाणात शासकीय वा खासगी रुग्णालयात उपचार घेताना आढळतात. सोबत या भागात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांसह सगळ्याच गटातील रुग्णांचीही संख्या मोठी आहे. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यावर नियंत्रणाकरिता बेंगळुरूचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. थुप्पील व्यंकटेश यांनी पुढाकार घेत उपराजधानीत पहिले विषबाधा उपचार केंद्र स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. हे केंद्र झाल्यास ते मध्य भारतातील पहिलेच केंद्र ठरेल, हे विशेष.
डॉ. व्यंकटेश हे ‘लेड पॉयझनिंग प्रिव्हेंशन ग्रुप’चे आंतराष्ट्रीय अध्यक्ष आहे. ते नागपूरला विषबाधेसंबंधीत एका परिषदेसाठी आले असता त्यांनी या केंद्राकरिता पुढाकार घेतला आहे. विदर्भासह मध्य भारतातील तीन राज्यांना मोठय़ा प्रमाणावर घनदाट जंगले लाभली आहेत. येथे साप, विंचू यासह इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विषारी प्राणी आहेत. त्यांच्या दंशामुळे या भागात अनेकांना नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची विषबाधा होत असते. त्याचबरोबर मानसिक ताण वाढल्यावर विदर्भासह इतर अनेक भागातील शेतकरी वा अन्य लोक विविध कारणांमुळे कीटकनाशके वा अन्य प्रकारचे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करताना नेहमीच सापडतात.
त्यामुळे विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड या भागातील जवळपास सगळ्याच शासकीय व खासगी रुग्णालयात अशा रुग्णांची संख्या मोठी आढळते. त्यातील अतिगंभीर गटातील रुग्णांना उपचाराकरिता नागपूरच्या मेडिकल वा मेयोसह इतर मोठय़ा खासगी रुग्णालयात पाठविले जाते. या रुग्णालयात विषबाधेवर आधुनिक पद्धतीप्रमाणे उपचार होणे गरजेचे आहे. त्याकरिता विविध अद्यावत तपासण्या व दिल्या जाणाऱ्या औषधांची मात्रा काळजीपूर्वक तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिली जाणे आवश्यक आहे. परंतु या भागातील शासकीय व खासगी रुग्णालयात हल्ली या नियमांचे पालनच होताना दिसत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. येथे सगळ्याच रुग्णांवर जवळपास सारखेच उपचार केले जात असल्याने येथे विषबाधेमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यावर नियंत्रणाकरिता भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम केलेले बेंगळुरूचे नामवंत शास्त्रज्ञ डॉ. व्यंकटेश यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी मध्य भारतातील पहिले विषबाधा उपचार केंद्र नागपूरला स्थापन करण्याचे ठोस आश्वासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाला दिले आहे. त्याचा खर्चही उचलण्याची तयारी दर्शवली आहे. हे केंद्र सुरू करण्याकरिता लागणाऱ्या उपकरणासाठी केवळ २ लाखांच्या आसपास खर्च असून त्याकरिता मेडिकल प्रशासनाने प्रस्ताव पाठविण्याची सूचना त्यांनी केली आहे.
हा प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून तो लवकरच सादर केला जाणार असल्याने या केंद्राचा मार्ग मोकळा होणार आहे. हे केंद्र झाल्यास ते महाराष्ट्रातील पुणे येथील खासगी संस्थेनंतर राज्यातील दुसरे असणार आहे तर, शासकीय संस्थेत पहिल्याच केंद्राचा मान मेडिकलला मिळणार आहे.

उपराजधानीत चारशेहून जास्त मृत्यूंची नोंद
नागपूरच्या मेडिकल, मेयोसह सगळ्या खासगी रुग्णालयात प्रत्येक वर्षी सर्प, विंचूसह विविध विषारी प्राण्याच्या दंशाने आणि विष प्राशन केल्यामुळे चारशेहून जास्त मृत्यू नोंदवण्यात येतात. हे रुग्ण नागपुरात विदर्भाच्या वेगवेगळ्या भागांसह शेजारच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड येथूनही उपचाराकरिता येत असतात. या विषबाधा उपचार केंद्रामुळे ही संख्या कमी होण्यास मदत होण्याची आशा वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहे.

संशोधनाला वाव मिळणार- डॉ. सुरपाम
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. थुप्पील व्यंकटेश आणि मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या प्रयत्नाने मेडिकलमध्ये प्रस्तावित विषबाधा उपचार केंद्रामुळे रुग्णाच्या शरीरात गेलेले विष योग्य तपासणीने वेळीच ओळखता येईल. सोबत रुग्णाला दिल्या जाणाऱ्या औषधांच्या डोससह उपचाराची अचूक दिशाही निश्चित होण्यास मदत होईल. या केंद्रात संशोधनाला वाव असून नवीन उपचार पद्धत विकसित होऊ शकणार आहे. केंद्राकडून इतरही वैद्यकीय संस्थांना मार्गदर्शन शक्य असल्याने त्याचा लाभ मध्य भारतातील रुग्णांना होईल, असे मत मेडिकलच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. सुरपाम यांनी व्यक्त केले.